अहिल्यानगर, दि.२३
राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अहिल्यानगर जिल्हा माहिती कार्यालयाच्या जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मुकुंद चिलवंत यांनी आज स्वीकारला. यानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात साध्या पण उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता.
मुकुंद चिलवंत यांना माहिती व जनसंपर्क विभागातील विविध स्तरांवर काम करण्याचा समृद्ध अनुभव आहे. मंत्रालय, मुंबई येथील वृत्तचित्र शाखेत कार्यरत असताना त्यांनी शासनाच्या विविध विकासात्मक उपक्रमांचे प्रभावी दृकश्राव्य दस्तावेजीकरण, जनजागृतीपर माहितीपट निर्मिती तसेच जनसंपर्कविषयक विविध उपक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली. अहिल्यानगर येथे पदभार स्वीकारण्यापूर्वी ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या प्रशासकीय अनुभवामुळे तसेच प्रभावी संवादकौशल्यामुळे शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा प्रचार-प्रसार अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यभार स्वीकारल्यानंतर श्री. चिलवंत यांनी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि निर्णयांची माहिती नागरिकांपर्यंत अधिक वेगाने, अचूकपणे व परिणामकारक पद्धतीने पोहोचविण्यासाठी सर्वांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच प्रसारमाध्यमांशी सुसंवाद राखत माहिती विभागाची विश्वासार्हता अधिक बळकट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी मावळते माहिती अधिकारी अमोल महाजन यांनी श्री. चिलवंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही त्यांचे स्वागत करून नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
या प्रसंगी लिपिक आयुष बाळदे, तुषार पाटील वाहन चालक प्रवीण मुठे आदी उपस्थित होते.


