नेवासा/प्रतिनिधी
भारत देशाला युवकांचा देश असे संबोधले जाते, कारण भारतामध्ये तरुणांचे प्रमाण हे अधिक आहे. राष्ट्राच्या विकासामध्ये युवक हा राष्ट्राच्या विकासाचा कणा आहे असे प्रतिपादन लेखक व प्रेरणादायी वक्ते दत्तात्रय वारकड यांनी केले.
नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथील वकीलराव लंघे पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना श्री.वारकड बोलत होते.
श्री.वारकड पुढे म्हणाले की, आज भारत देश हा जागतिक महासत्ता बनण्याच्या दृष्टीने वाटचाल करत आहे आणि या विकासामध्ये तरुणांचे योगदान अतिशय मौलिक आहे. विद्यार्थ्यांनी आपला आत्मिक विकास साधत असताना व्यक्तिमत्त्वाचा विकास चालत असताना प्रगत अशा तंत्रज्ञानाचा वापर करून आपले जीवन सुजलाम् सुफलाम् बनवावे परंतु इफेक्टचा इफेक्ट, साईड इफेक्ट असं म्हटलं जातं म्हणजे आपला विकास साधत असताना मोबाईल सारख्या प्रगत तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आपल्या जीवनामध्ये अतिरिक्त ताण तणाव निर्माण होणार नाही व त्याचे दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर होणार नाहीत याची काळजी विद्यार्थ्यांनी घेणे काळाची गरज आहे. मोबाईलचा वापर फक्त कामा पुरताच करावा.
वाचन संस्कृतीचा विकास साधण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण करण्याकरिता प्रवृत्त केले. त्याकरिता वेळेचे व्यवस्थापन कसे करावे याचा मार्गही सांगितला. जर विद्यार्थ्यांनी सकाळी लवकर उठण्याची सवय लावली म्हणजे त्यांना वेळेचा सदुपयोग करून घेता येईल. जर एक तास आपण लवकर उठलो तर वर्षभराचे ३६५ कामाचे तास आपल्याला अतिरिक्त मिळतात म्हणजेच ४५ दिवस अतिरिक्त मिळतात, याचाच अर्थ जवळपास दीड महिना अतिरिक्त मिळतो. इतरांचे बारा महिने तर सकाळी लवकर उठणाऱ्या विद्यार्थ्यांचे साडेतेरा महिने होतील. म्हणजे हा दीड महिना जो आहे हा विद्यार्थ्यांना आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधण्यासाठी अतिरिक्त मिळत आहे. या अतिरिक्त वेळेमध्ये विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी आत्मचरित्र पुस्तकांचे वाचन करावे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर , स्वामी विवेकानंद, संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या व इतर महान विभुती यांचे आत्मचरित्राचे तसेच प्रेरणादायी पुस्तकांचे दोन पानं तरी वाचन करावे की जेणेकरून आपला व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्याकरिता प्रेरणा मिळेल. त्याचप्रमाणे दहा ते पंधरा मिनिटं निसर्गाच्या सानिध्यामध्ये फिरावे, व्यायाम करावा, ध्यानधारणा करावी जेणेकरून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होईल व आपले जीवन सुजलाम सुफलाम बनेल. एक आदर्श विद्यार्थी म्हणून शाळेमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटण्यास मदत होईल असे मौलिक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले. मन सांगेल तसं आपण वागणे ऐवजी आपण आपल्या मनाला नियंत्रित ठेवून आपण सांगेल तसं आपलं मन वागलं पाहिजे. घड्याळाच्या काट्याप्रमाणे आपण फिरण्याऐवजी आपण सांगू त्या पद्धतीने घड्याळ चालले पाहिजे. म्हणजेच वेळेचे नियोजन झालं पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थापन करण्याचा सोयीस्कर मार्गही श्री.वारकड यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितला.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे.आपल्या या महाराष्ट्रामध्ये अनेक संत महंत शूरवीर थोर समाज सुधारक यांनी आपले आयुष्य पणाला लावून आपल्या या महाराष्ट्रामध्ये कार्य कर्तुत्वाचा ठसा उमटवला व आपल्या भारत देशाला जागतिक पातळीवर सुजलाम् सुफलाम् बनवण्याकरिता आपले आयुष्य खर्च केले. संस्कृतीचा वारसा जतन करण्याचे कार्य हे युवकांच्या हाती आहे आणि त्याकरिता युवकांनी आपला आत्मिक विकास घडवून आणणे अतिशय महत्त्वाचे आहे असेही दत्तात्रय वारकड यांनी नमूद केले. सोशल मीडिया, इंस्टाग्राम, फेसबुक रिल्स याचा आपल्या जीवनामध्ये विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी विद्यार्थ्यांनी निश्चितच घ्यावी व मोबाईलचा वापर हा फक्त कामापुरताच करावा असेही कळकळीचे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना श्री वारकड यांनी केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब धनवटे यांनी दत्तात्रय वारकड यांचा परिचय करून दिला व स्वागत केले. महेश देशमुख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सागर वाघमारे यांनी आभार मानले.


