अहिल्यानगर/प्रतिनिधी
अहिल्यानगर मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता
श्रीमती सायली राजेंद्र पाटील यांना महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाकडून सन २०२१ वर्षासाठीचा वैयक्तिक “उत्कृष्ठ अभियंता” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
श्रीमती सायली राजेंद्र पाटील या अहिल्यानगर मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी कालवा मुखाशी घनमापन पध्दतीने पाणी पुरवठा करून वहनव्यय नियंत्रण, सिंचन आणि बिगर सिंचन देयके, ऑनलाईन बिलिंग प्रणाली वापर करणे. सिंचन बिगर सिंचन पाणीपट्टी वसुली १०० टक्के पूर्ण,धरणांची नियमित तांत्रिक तपासणी, नोंदी व गेट्सची देखभाल दुरुस्ती, पूररेषा आखणी, पूर नियंत्रणासाठी उपाययोजना,कालवा सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक DPR तयार करणे, दुरुस्तीबाबत नियोजन करणे.बिगर सिंचन देयक प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी, पाणीपट्टी भरण्यासाठी क्यूआर कोडचा उपयोग,
शासकीय मालमतांचे रक्षण, शासकीय जमिनींच्या ७/१२ उताऱ्यावर जलसंपदा विभागाचे नांव लावणेबाबत कार्यवाही,वांबोरी उपसा सिंचन योजना नियोजन करणे, पाखरण कार्यक्रमांतर्गत कालवा स्वच्छता कामे करणे,पाणी वापर संस्थांचे सुयोग्य पाणी पुरवठा नियोजनासाठी नवीन गेट बसविणेचा विशेष कार्यक्रम, पाणी वापर संस्थांची सक्षमीकरणाची कार्यात उल्लेखनीय कामगिरी बजावलेली आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेवून त्यांना सन २०२१ वर्षासाठीचा वैयक्तिक “उत्कृष्ट अभियंता” पुरस्कार जाहिर झाला होता.
आज बुधवार दि.१६ सप्टेंबर रोजी मुंबई येथे झालेल्या अभियांत्रिकी सेवेतील उत्कृष्ट अभियंता पुरस्कार वितरण कार्यक्रमात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे हस्ते श्रीमती सायली पाटील यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, सचिव प्रकल्प समन्वयक जयंत बोरकर, सचिव लाभक्षेत्र विकास प्रकाश मिसाळ, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हनुमंत धुमाळ, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जयंत गवळी, तापी खोरे पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेश मोरे, कोकण खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक सुदर्शन पगार,श्री.संजय बेलसरे, अतुल कपोले, श्री.हनुमंत गुणाले यांच्यासह विभागाचे प्रमुख अधिकारी आणि अभियंते उपस्थित होते.


