Thursday, September 24, 2026

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे-कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

शिर्डी/प्रतिनिधी

शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी सर्व शासकीय विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याबरोबरच पीक विमा आणि कर्जमुक्ती योजनांचा लाभ प्राधान्याने देण्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.

संगमनेर तालुक्यातील पिंपळे गावातील शेतकरी सोपान चकोर यांच्या शेताच्या बांधावर प्रत्यक्ष जात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दुष्काळसदृश परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत संगमनेरचे आमदार अमोल खताळ, राज्याचे कृषी आयुक्त सुरज मांढरे, जिल्हाधिकारी पंकज आशिया, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, कृषी संचालक विनयकुमार आवटे, विभागीय कृषी सहसंचालक, बाबासाहेब जेजूरकर , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. सुधाकर बोराळे संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे, तालुका कृषी अधिकारी श्रीमती बोडखे यांच्यासह महावितरण, ग्रामविकास आणि महसूल विभागाचे संबंधित अधिकारी आणि पिंपळे गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिंपळे गावातील काही शेतकऱ्यांच्या पीक विम्यात येत असलेल्या अडचणींची तातडीने दखल घेत, कृषी आणि महसूल विभागाने याबाबत तातडीने चालू खरीप हंगामात कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश कृषिमंत्री भरणे यांनी संबंधितांना दिले.

*शेतकरी बांधवांना बांधावर जाऊन लाभ देण्याचे निर्देश*

दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची स्वप्ने भंग पावली आहेत. अशा कठीण प्रसंगी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे कर्तव्य असून प्रशासनामार्फत शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शासकीय योजनांचा लाभ देण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

शेतकऱ्यांच्या हिताला आणि मदतीला सर्वोच्च प्राधान्य देऊन शेती, पशुपालन, चारा व पाणीटंचाई यावर तातडीने उपाययोजना करण्याचे सूचित करण्यात आले.केंद्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाअंतर्गत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठीची परिपूर्ण अधिसूचना शासन स्तरावरून लवकरच निर्गमित केली जाणार आहे. यामध्ये सर्वसमावेशक मदतीचा समावेश असणार असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले.

*शेताच्या बांधावर जात कृषिमंत्र्यांनी शेतकरी बांधवास दिला धीर*.

सोयाबीन पिकाची पाहणी करत असताना पावसाअभावी सोयाबीन पिकाचे पूर्ण नुकसान झाले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शेतकरी बांधवांना धीर दिला. कृषिमंत्री भरणे म्हणाले की स्वतः मी शेतकरी असून शेतकऱ्यांच्या वेदना आणि परिस्थिती अनुभवली असल्याने आपण शेतकरी बांधवांच्या दुःखात सहभागी असून शासनामार्फत देण्यात येणाऱ्या सर्व मदतीसाठी खंबीरपणे उभे असल्याचे ग्वाही दिली . शेतकऱ्यांना वीज पुरवठा वेळेत होत नसल्याने पाणीपुरवठा होण्यास अडचण होऊ नये यासाठी वीज महावितरण च्या संबंधित विभागाने डीपी आणि ट्रांसफार्मर योग्य वेळेत उपलब्ध करून देण्याबाबतचे निर्देश महावितरण विभागास दिले.

*पीक परिस्थितीचा आढावा*

अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे पिकाचे नुकसान झाले असून मुगाची पेरणी ४७.८३% आणि उडदाची पेरणी ६१.४५% झाली आहे. तसेच कपाशीची ९१.६६% पेरणी झाली असून पिके पाती, फुलोरा व बोंडे धरण्याच्या अवस्थेत आहेत. पावसा अभावी वाढ खुंटली असून पाती व फुलांची गळ होत आहे. तसेच काही ठिकाणी रस शोषक कीड व गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सोयाबीनची ११३.०३% पेरणी झाली असून पीक सध्या शेंगा भरण्याच्या संवेदनशील अवस्थेत आहे. पाण्याच्या ताणामुळे शेंगा चपटी राहून दाणे बारीक राहण्याची व हलक्या जमिनीवरील पिके सुकण्याची शक्यता आहे.
मका पिकाची १६३.३४% पेरणी झाली असून पिके कणसे भरण्याच्या अवस्थेत आहेत. अपुऱ्या पावसामुळे वाढ खुंटली असून वजनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.तुरीची १३४.३२% पेरणी झाली असून पाण्याच्या ताणामुळे वाढ खुंटली आहे. खरीप बाजरीची ६३.८३% पेरणी झाली असून पावसाच्या खंडामुळे बाजरीची वाढ खुंटून पीक सुकले आहे. जिल्ह्यात एकूण झालेले पेरणी आणि पिकांच्या परिस्थितीबाबत आढावा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सादर केला.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!