नेवासा/प्रतिनिधी
एकच गावात तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची लक्ष्मीमाता, माहूरची रेणुकादेवी, वणीची सप्तशृंगी देवी अशी साडेतीन शक्तिपीठे एकत्र असल्याने नवरात्र काळात भाविकांना दर्शनाचा लाभ मिळत असलेल्या रांजणगावदेवीची उद्या शनिवार दि.१७ ऑक्टोबर रोजी यात्रा आहे.
नेवासा तालुक्यातील रांजणगाव येथील नवसाला पावणाऱ्या
तुळजाभवानी, लक्ष्मीमाता, रेणुकादेवी व सप्तशृंगी देवी मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवामध्ये घटस्थापने पासून ते दसऱ्यापर्यंत निरनिराळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या उत्सवानिमित्ताने मंदिर परिसरात साफसफाई करून मंदिरात आकर्षक अशी विद्युत रोशनाई करण्यात आली आहे. घटस्थापनेपासून येथे परिसरातून उपासकरू येतात व तेथेच नऊ दिवस राहतात. नऊ दिवस येथे फराळाची व्यवस्था केलेली असते. रांजणगाव येथे भाविकांना देवीच्या साडेतीन शक्तीपीठाचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभते. माहुरगडची रेणुका माता,तुळजापूरची तुळजाभवानी माता, कोल्हापूरची महालक्ष्मी माता हे पूर्ण तीन शक्ती पीठे तर तर वनीची सप्तशृंगी हे अर्धे शक्तिपीठ असे एकूण साडेतीन शक्तीपीठाच्या दर्शनाचा एकत्रित लाभ भाविकांना मिळतो. याबरोबरच राशींनची यमाई माता, चेंडूळची चौंडेश्वरी माता या देवींची देखील भव्य दिव्य अशी मंदिरे आहेत.
नेवासा तालुक्यात प्रसिद्ध असलेले हे स्थान भाविकांच्या दृष्टीने अतिशय सोयीचे असे आहे. हे स्थान अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर हायवे निकट आहे. त्यामुळे येथे प्रति मंगळवार, शुक्रवार पौर्णिमा व नवरात्र उत्सवात मोठी गर्दी असते. हे स्थान वडाळा बहिरोबा पासून नऊ किलोमीटर पूर्वेला तर राज्य मार्ग क्रमांक ४४ नेवासा शेवगाव रोडवरील भेंडा कारखान्यापासून पश्चिमेला पाच किलोमीटर अंतरावर आहे.
श्री क्षेत्र रांजणगाव देवी हे स्थान पुरातन आहे पूर्वीच्या काळी हे गाव जहागिरीचे गाव होते. जागीरदाराची देवीवर निश्चीम श्रद्धा होती. कोणतेही कार्य जागीरदार देवीच्या पूजनाने करीत असे व वर्षातून अनेक वेळा तुळजापूरला देवीच्या दर्शनाला जात असे. परंतु एका चैत्र पोर्णिमेला जागीरदार आजारी असल्याने तुळजापूरला जाऊ शकला नाही. त्यांच्या मनात देवी दर्शनाला न जाण्याचे दुःख बोचत राहिले. त्याने मनोमन देवीची आराधना केली . देवीने जहागीरदाराला तेजस्वी स्त्री रूपात दर्शन देऊन गावाच्या लगत पश्चिम दिशेला जेथे मी आपणास प्रथम दिसले तेथे माझी प्राणप्रतिष्ठा केल्यास माझ्या अखंड सेवेचा लाभ तुला मिळेल, तुला तुळजापूरला येण्याची आवश्यकता राहणार नाही सांगितले. जाहागीरदाराने त्या जागेवर तुळजाभवानी माता मूर्तीच्या तांदळ्याची चैत्रशुद्ध पोर्णिमेला स्थापना करून मंदिराची निर्मिती केली. तेव्हापासून लोक मनोभावे सेवा करू लागले व त्याच काळात माहुरगडची रेणुका माता व सप्तशृंगी माता या परिसरातून भ्रमण करत असताना त्यांनी देवी मंदिरात वास्तव्य केले त्यांनाही हा परिसर आवडल्याने व आपल्या बहिणी सोबत याच परिसरात वास्तव्य करण्याची इच्छा ब्राह्मण भक्तास दृष्टांत देऊन व्यक्त केली. तुळजाभवानी मातेच्या मंदिरापासून ३०० व ५०० फूट अंतराने देवींचे सदृश्य मूर्तीचे तांदळे आढळल्याने तेथे रेणुका माता व सप्तशृंगी माता यांची मंदिरे स्थापन करण्यात आली. भाविकांचा दूर जाण्याचा त्रास कमी झाला. येथे दरवर्षी चैत्र पौर्णिमेला गंगेवरून कावडीने पाणी आणून देवीची विधिवत पूजा करून यात्रा भरवली जाऊ लागली पाहुणी म्हणून देवीच्या प्रथम पूजेचा मान रेणुका मातेला देण्यात येतो. नंतर तुळजाभवानीला मान दिला जातो अशी आख्यायिका जुने लोक सांगतात. येथे जागीरदाराने दगडचुना माती यांची भव्य अशी मंदिरे बांधलेली होती, पूर्वीच्या काळी मंदिरे गावापासून काही प्रमाणात दूर असल्याने भाविकांसाठी पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी येथे जुन्या बारवा आहेत. त्याच प्रमाणे येथे पुरातन असे हेमांडपती सिद्धेश्वर मंदिर व देवीच्या मंदिरापासून पूर्वेला एक किलोमीटर अंतरावर जागीरदाराने करमणुकीसाठी व्यवस्था केलेली आपणास आजही दिसून येते. हे ठिकाण कलावंतीनीची बारव या नावाने प्रसिद्ध आहे. नंतरच्या काळात जागीरदाराने तुळजाभवानी मातेच्या पूजेचा मान गावातील पेहेरे कुटुंबाकडे दिला तर रेणुका माता व सप्तशृंगीमाता यांच्या पूजेचा मान ब्राह्मण समाजातील लोंढे परिवाराकडे होता. यात्रेच्या वेळेस इतर सर्व सेवा सर्व समाजात विभागण्यात आलेली पाहण्यास मिळते. यात्रेच्या वेळेस पालखीचा मान लोंढे व पेहेरे परिवाराकडे पालखी खांद्यावर घेण्याचा व मिरवण्याचा मान कापसे कुटुंबाकडे, पालखी पुढे दिवे घेऊन चालण्याचा मान मुस्लिम परिवारातील सय्यद कुटुंबाकडे, पालखी समोर वाद्य काम करण्याचा मान धनगर परिवारातील पंडित व राशिनकर कुटुंबाकडे, आज मितीपर्यंत व्यवस्थित व भक्तिभावाने सुरू असून दीपमाळ पाजळ्याचा मान चांभार समाजातील शेंडे परिवाराकडे आहे. वर्षातून दोन वेळेस देवीची भव्य अशी यात्रा भरते चैत्रशुद्ध पौर्णिमेला ‘ दोन दिवस व नवरात्र उत्सवात सातव्या माळेला भव्य अशी यात्रा भरते. नवसाला पावणारी देवीची ख्याती असल्याने दूर दूर वरून लोक येथे यात्रा उत्सवात येऊन नवस पूर्ण करतात. नवरात्र उत्सवात नऊ दिवस येथे परिसरातील भाविक येऊन उपवास करून घट बसवितात. नवरात्रात नऊ दिवस देवी भागवत जागरण गोंधळ भजन कीर्तन या कार्यक्रमाचे आयोजन केलेले असते. भाविकांसाठी फराळाची व्यवस्था केलेली असते ग्रामस्थांनी व भाविकांच्या देणगीतून या सर्व मंदिराचा करून भव्य दिव्य अशी उंच मंदिरे बांधली आहेत. भाविकांच्या सेवेसाठी पाणी व्यवस्था स्वयंपाक व्यवस्था शौचालय व आंतर व विविध कार्यक्रमासाठी सभामंडपाच्या निर्माण केलेले आहे. येथे दररोज पहाटे पाच वाजता व सायंकाळी साडेसहा वाजता आरती केली जाते रांजणगावात कुठेही डबल मजली इमारत बांधली जात नाही. तसेच या परिसरात बैलांना पोळ्याच्या दिवशी हिंगूळ लावला जात नाही. नवरात्र उत्सवात परिसरातील भाविक बहुसंख्येने उपस्थित असतात या परिसरात श्रद्धेप्रमाणे भाविकांनी कोल्हापूरची महालक्ष्मी यमाई देवी व सौंडूळ ची चौंडेश्वरी यांची देखील मंदिरे आहेत त्यामुळे भाविकांना आपल्या इच्छित शक्तीपीठाच्या दर्शनाचा लाभ येथे एकाच वेळी मिळतो भाविकांना येथे येण्यासाठी परिसरातून निरनिराळ्या साधनांची उपलब्धता असते नवरात्रात दसऱ्याच्या दिवशी अथवा नव्या दिवशी क्रमाक्रमाने होम हवन होऊन देवीला नैवेद्य अर्पण केला जातो . होम झाल्यानंतर भाविक आनंदाने घराकडे प्रस्थान करतात आजही देवीचे भक्त पेहेरे कुटुंब व धुमाळ कुटुंब सेवा करत आहेत. तुळजाभवानी मातेचे जिर्णोद्धाराचे काम सोपानराव पेहेरे यांच्या मार्गदर्शनातून तर रेणुका माता व सप्तशृंगी माता महालक्ष्मी माता यांच्या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम निवृत्त तालुका बँक विकास अधिकारी पंढरीनाथ वाकचौरे पाटील व प्रगतशील शेतकरी कै.भास्करराव कडू पाटील यांचे मार्गदर्शनातून करण्यात आले आहे. भाविकांच्या देणगी मधून ग्रामस्थांच्या वर्गणीतून मंदिराचे काम पूर्णत्वास आले आहे. तसेच रेणुका माता मंदिराचे सार्वजनिक ट्रस्ट नोंदणी करण्यात आली आहे शासनाचा निधी मिळवण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व माजी आमदार शंकरराव गडाख तसेचविद्यमान आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या अथक प्रयत्नातून या देवस्थानचा शासनाच्या क-वर्ग देवस्थानात समावेश करण्यात आला आहे. चालू वर्षी देवी मंदिर परिसरात भव्य अशा मंगल कार्यालयाचे उद्घाटन ह भ प महंत भास्करगिरी महाराजांच्या हस्ते करण्यात आले आहे. या कार्यालयासाठी आमदार विठ्ठलराव लंघे यांनी देवस्थान निधी प्रथम हप्ता म्हणून ३० लाख रुपये लवकरात लवकर शासनाकडून मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. यावर्षी नवरात्र उत्सवानिमित्ताने सात दिवस देवी भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रम यशस्वीतेसाठी गावातील सर्व समाजातील लोक भक्ती भावाने सहकार्य करत आहेत ग्रामस्थांच्या वतीने या यात्रा सप्ताहाचा आनंद घेण्याची व आपली नवसपूर्ती करून समाधान व आनंद मिळवण्याची संधीचा फायदा करून घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
–अशोक पंडीत
पत्रकार,रांजणगाव देवी
मो.नं.7588169446


