Tuesday, October 13, 2026

अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी साधला 96 ग्रामपंचायतींतील 11200 महिलांशी संवाद

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर/सुखदेव फुलारी

ग्रामीण भागातील महिलांचे संघटन बळकट करून त्यांना महिला बचत गटांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि ग्रामीण विकासाच्या प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने सेवा संकल्प अभियानांतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या उपस्थितीत आज (दि. 12 ऑक्टो) रोजी ‘ग्रामसंवाद’ हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील महिला बचत गट चळवळीत अद्याप मोठ्या प्रमाणात महिला सहभागी होणे बाकी असलेल्या 96 ग्रामपंचायतींमधील सुमारे 11200 महिलांनी या उपक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग नोंदविला.

या ग्रामसंवादाच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी महिलांशी दृकश्राव्य माध्यमाव्दारे संवाद साधत महिला बचत गटांची स्थापना, महिलांचे संघटन, बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन साध्य करण्याच्या संधी तसेच ग्रामीण विकास प्रक्रियेत महिलांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. महिलांनी एकत्र येऊन बचतीची सवय जोपासावी, उपलब्ध शासकीय योजना व अभियानांचा लाभ घ्यावा आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वतःची आर्थिक प्रगती साधावी, यासाठी त्यांनी प्रोत्साहित केले. या उपक्रमात ग्रामस्तरावरील सरपंच, ग्रामविकास अधिकारी, प्रशासक, समुदाय संसाधन व्यक्ती (CRP), समुदाय समन्वयक (CC) तसेच महिलांशी थेट संवाद साधण्यात आला. महिला बचत गट चळवळीची उद्दिष्टे, त्याचे महत्त्व आणि ग्रामीण महिलांसाठी उपलब्ध असलेल्या संधी यांची माहिती देऊन अधिकाधिक महिलांनी बचत गटांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
प्रकल्प संचालक श्रीमती मंजुषा ठवकर यांनी महिला सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन, स्वयंरोजगार निर्मिती आणि शाश्वत ग्रामीण विकासामध्ये महिला बचत गटांचे महत्त्व सांगितले. महिलांनी संघटित होऊन सामूहिक प्रयत्नांच्या माध्यमातून विकासाच्या नव्या संधी निर्माण कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
अभियानाचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सोमनाथ जगताप यांनी या ग्रामसंवादामुळे महिलांना अभियानाची उद्दिष्टे, महिला बचत गटांचे फायदे आणि त्यातून उपलब्ध होणाऱ्या संधी यांची सविस्तर माहिती मिळाली. संवादादरम्यान महिला बचत गटांमध्ये सहभागी होण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत गटात सहभागी होण्याची इच्छा दर्शविली. 96 ग्रामपंचायतींमधील सुमारे 2800 महिलांपर्यंत थेट पोहोचलेल्या या ग्रामसंवाद उपक्रमातून ग्रामीण महिलांना संघटित करण्यासाठी आणि महिला बचत गट चळवळीचा विस्तार करण्यासाठी महत्त्वपूर्ण पुढाकार घेण्यात आला आहे. महिलांचा सहभाग वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे, शासकीय योजनांशी जोडणे आणि ग्रामीण विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!