अहिल्यानगर, दि. ८
राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या संकल्पनेतून ‘बाळाची सुवर्णमयी ८ वर्षे’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे.
मुलांच्या मेंदूचा 90% विकास त्याच्या वयाच्या आठ वर्षाच्या आतच होत असतो म्हणून बालकाच्या प्रारंभीक विकासासह त्याच्या आरोग्याचा भक्कम पाया निर्माण करण्यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील गरोदर व स्तनदा मातांमध्ये व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे.
बालकाच्या आयुष्यातील पहिली आठ वर्षे ही शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असतात. त्यात विशेषतः गर्भधारणेपासून बालकाच्या जन्मानंतरच्या पहिल्या दोन वर्षांपर्यंतचा सुमारे १,००० दिवसांचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. गर्भावस्थेतील सुमारे २७० दिवस आणि जन्मानंतरचे सुमारे ७३० दिवस मिळून हा कालावधी होतो. या काळात बालकाच्या मेंदूची वाढ, शारीरिक विकास, रोगप्रतिकारशक्ती आणि भविष्यातील आरोग्याचा पाया मजबूत होण्यास मदत होते.
या अनुषंगाने गर्भावस्थेतील मातृपोषण, संतुलित आहार, आवश्यक आरोग्य तपासण्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लोह व फॉलिक अॅसिडसह आवश्यक पूरक आहाराचे सेवन याबाबत गरोदर मातांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच जन्मानंतरच्या काळात बालकाची योग्य काळजी, पोषण, आरोग्य आणि मेंदूच्या विकासासाठी आवश्यक बाबींबाबतही पालकांना माहिती दिली जाणार आहे.
उपक्रमांतर्गत ० ते ३ वर्षे, ३ ते ६ वर्षे आणि ६ ते ८ वर्षे अशा वयोगटानुसार बालकाच्या विकासासाठी आवश्यक काळजी व पालकांची भूमिका याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. बालकाच्या शारीरिक वाढीसोबतच त्याच्या बौद्धिक, भावनिक व सामाजिक विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यावरही भर देण्यात येणार आहे.
*प्रत्येक महिन्यात आरोग्य केंद्रांवर मार्गदर्शन*
जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दर महिन्याच्या ९ तारखेला, तर उपकेंद्रांमध्ये दर महिन्याच्या १० ते १४ तारखेपर्यंत गरोदर महिला व स्तनदा मातांसाठी मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. या सत्रांना मातांसोबत त्यांच्या पतींनीही उपस्थित राहावे, यासाठी संबंधित वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविका यांच्या माध्यमातून पूर्वसूचना देऊन पालकांना आमंत्रित करण्यात येणार आहे.
या सत्रांमध्ये ‘बाळाची सुवर्णमयी ८ वर्षे’ या संकल्पनेचे महत्त्व, पहिल्या १,००० दिवसांचे महत्त्व, मातृ व बाल आरोग्य, पोषण, बालकाच्या मेंदूची वाढ आणि बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.
बालकाच्या आरोग्याचा पाया जन्मानंतर नव्हे, तर गर्भधारणेपासूनच घडत असल्याने या उपक्रमाच्या माध्यमातून ‘सुदृढ माता, निरोगी बालक आणि सक्षम भवितव्य’ या उद्देशाने पालकांपर्यंत योग्य आरोग्यविषयक माहिती पोहोचविण्यावर भर देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक गरोदर व स्तनदा मातांनी या उपक्रमाचा लाभ घेऊन आपल्या बालकाच्या आरोग्यपूर्ण आणि सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केले आहे.


