नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईची परिस्थिती तसेच जलजीवन मिशन अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध पाणीपुरवठा योजनांच्या प्रश्नावर आमदार श्री. विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या अनुषंगाने आज मंत्रालय, मुंबई येथे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मा. ना. श्री. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आढावा बैठक पार पडली.
नेवासा तालुक्यात यंदा अपुऱ्या पावसामुळे पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, सध्या मोरेचिंचोरेसह दोन गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. आगामी काळात तालुक्यातील १०८ गावांना पाणीटंचाईचा फटका बसण्याची शक्यता असून, त्यापैकी ९१ गावांसाठी पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने पूर्वतयारी करण्यात येत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
या बैठकीत जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा स्वतंत्रपणे व सविस्तर आढावा घेण्यात आला. जलजीवन मिशन अंतर्गत २० योजनांची कामे पूर्ण झाली असून, आणखी १८ योजना पूर्णत्वाच्या टप्प्यात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यामध्ये १६ रेट्रोफिटिंग योजनांची कामे प्राधान्याने पूर्ण करणे शक्य असल्याचे सांगण्यात आले. तसेच आणखी ६ योजनांची कामे पूर्ण करण्याच्या शक्यतेवरही चर्चा झाली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडील योजनांच्या आढाव्यात गळनिंब पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न विशेषत्वाने उपस्थित करण्यात आला. या योजनेच्या रायझिंग मेन पाइपलाइनची मूळ प्रस्तावित लांबी २,२०० मीटरवरून ७,४०० मीटरपर्यंत वाढली असल्याने त्यासंबंधी आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय बाबी तातडीने मार्गी लावून योजनेच्या कामाला गती देण्याची मागणी आमदार लंघे पाटील यांनी केली.
यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी दोन्ही यंत्रणांकडील अपूर्ण योजनांमुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिल्या. विशेषतः ज्या योजनांची कामे अंतिम टप्प्यात आहेत, त्या प्राधान्याने पूर्ण करून संबंधित गावांमध्ये प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा. तसेच संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रत्येक गावासाठी आवश्यक उपाययोजना आतापासूनच हाती घेण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
यावर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना अपूर्ण योजनांच्या कामांना गती देण्यासाठी कालबद्ध नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. डिसेंबर २०२६ ते जानेवारी २०२७ या कालावधीत जास्तीत जास्त योजना पूर्ण करून कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने आवश्यक तांत्रिक, प्रशासकीय व अंमलबजावणीसंबंधी कार्यवाही प्राधान्याने करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता टँकरद्वारे पाणीपुरवठा हा कायमस्वरूपी उपाय नसून उपलब्ध जलस्रोतांचा प्रभावी वापर करून गावांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. यासाठी अपूर्ण योजनांची कामे तातडीने पूर्ण करणे, पूर्ण झालेल्या योजना कार्यान्वित करणे आणि संबंधित यंत्रणांमध्ये योग्य समन्वय ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला.
**बैठकीस वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती**
या महत्त्वपूर्ण बैठकीस आमदार श्री. विठ्ठलराव लंघे पाटील, नेवासा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक (जल जीवन मिशन), अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक येथील मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अहिल्यानगर येथील अधीक्षक अभियंता, नाशिक विभागाचे उपसंचालक, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता व उपअभियंता, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक, मंत्रालयातील संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हास्तरीय संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
नेवासा तालुक्यातील प्रत्येक गावाला नियमित व पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडील सर्व अपूर्ण योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल. तसेच संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्राधान्याने राबविण्यात याव्यात, अशी भूमिका आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी व्यक्त केली.
* २० योजना पूर्ण, १८ योजना अंतिम टप्प्यात; अपूर्ण योजना डिसेंबर २०२६ ते जानेवारी २०२७ दरम्यान पूर्ण करण्यासाठी कालबद्ध नियोजनाच्या सूचना
* गळनिंब योजनेच्या वाढीव पाइपलाइन कामालाही गती देण्याचे निर्देश


