अहिल्यानगर/सुखदेव फुलारी
सध्याच्या तरुण पिढीतील अनेक तरुण आज मोबाईल कडे वळले असून मोबाईल पेक्षा त्यांना पुस्तकातून मोठ्या प्रमाणात ज्ञान मिळते जे त्यांचे आयुष्य घडवते त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त ग्रंथाचे वाचन केले पाहिजे असे प्रतिपादन मराठी भाषा समितीचे अशासकीय सदस्य महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष किशोर मरकड यांनी राज्य शासनाच्या , जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय,अहिल्यानगर यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी अंक प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून मनोगत व्यक्त करताना केले.
ते पुढे म्हणाले की राज्य शासनाच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर हे मराठी विश्वकोशापासून स्पर्धा परीक्षेला लागणारे सर्व पुस्तके तसेच अनेक लेखकांच्या कथा-कादंबऱ्या यांनी परिपूर्ण असे ग्रंथालय आहे . याला लागणारी वार्षिक फी ही अत्यंत कमी असून 32 हजार पुस्तकांचा लाभ वाचकांना मिळणार आहे.असून सध्या दोनशे दिवाळी अंक उपलब्ध करून वाचकांना दिवाळीचे फराळ दिले आहे. ज्याप्रमाणे दिवाळीच्या फराळात वेगवेगळे पदार्थ असतात त्याचप्रमाणे दिवाळी अंकात प्रत्येक वाचकाच्या आवडी निवडीप्रमाणे विविध विषयावरील दिवाळी अंकांचा समावेश आहे . प्रत्येक अंकात विविधता आहे .
महाराष्ट्र शासन, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय , अहिल्यानगर येथे आज दिवाळीच्या निमित्ताने दिवाळी अंकाचे प्रदर्शनाचे उद्घाटन किशोर मरकड यांच्या हस्ते व सेवानिवृत्त प्राध्यापक संजय कुलकर्णी आणि निशांत दिवाळी अंकाचे संपादक निशांत दातीर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी बोलताना जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के म्हणाले की जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाची लवकरच सावेडी रोडवरील प्रशस्त अशा इमारतीत स्थलांतरित होत आहे. तेथे जास्तीत जास्त जागा असल्याने आपण किमान 50,000 पुस्तके उपलब्ध करून देणार आहोत त्याचबरोबर मुलांसाठी नाममात्र शुल्क आकारून अभ्यासिका सुरू राहिल. ज्यासाठी आपण त्यांना सर्व स्पर्धा परीक्षांची पुस्तके मोफत उपलब्ध करून देणार आहोत तसेच ग्रंथालय विभागाच्या वतीने आपण मुलांसाठी तसेच वाचकांसाठी विविध वक्ते उपलब्ध करून देणार आहोत. यावेळी निशांत दातीर यांनी सुद्धा त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
या प्रदर्शनात विविध विषयावरील दीडशे पेक्षा जास्त दिवाळी अंक उपलब्ध असून हे प्रदर्शन 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत शासकीय सुट्ट्या वगळून सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.
तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, ग्रंथालयाच्या सभासदांना हे दिवाळी अंक वर्षभर वाचता येणार आहे. याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा.असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक ग्रंथालय निरीक्षक, रामदास शिंदे यांनी केले. आभार प्रदर्शन वरिष्ठ लिपिक प्रमोद गिरी यांनी केले.
याप्रसंगी संतोष कापसे ,ऋषिकेश जायभाये , संतोष वाडेकर, लक्ष्मण सोनवणे, वसंत कर्डिले, बबन भुजबळ, आकाश बंब आदींसह बहुसंख्य वाचक सभासद उपस्थित होते.


