नेवासा/प्रतिनिधी
ऊसाला ४ हजार ५०० रुपये प्रतिटन पहिली उचल आणि रेवेन्यू शेअरिंग फॉर्म्युला प्रमाणे रास्त भाव मिळावा या मागणीसाठी नेवासा तालुका शेतकरी संघटनेने भेंडा येथे साखरेचा ट्रक अडवला.
शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड. अजितदादा काळे यांच्या नेतृत्वात
नेवासा तालुका शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष मेजर अशोक काळे व युवा अध्यक्ष डॉ.रोहित कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भेंडा येथे नेवासा-शेवगाव रस्त्यावर ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना गेट समोर साखरेचा ट्रक अडवून धरला होता. शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ तुवर हे ही यावेळी उपस्थित होते .
शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष एडवोकेट अजितदादा काळे यांच्या सूचनेनुसार राज्यभर साखर अडविण्यास सुरुवात झालेली आहे.पश्चिम महाराष्ट्रात उसाला पहिली उचल ४ हजार रुपये टनापर्यंत गेलेली असताना अहिल्यानगर जिल्ह्यात मात्र ३१०० रुपयात बोळवण केली जात असल्याने शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे .अहिल्या नगर जिल्ह्यात उसाच्या रिकव्हरीचे कारण दाखवून साखर कारखानदार ऊस भाव कमी देत आहेत.
त्यामुळे रघुनाथ दादा प्रणित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर ऊस आडवण्यापेक्षा साखरेचे ट्रक अडवून किमान ६० रुपयाच्या खाली साखर देखील विकू नये अशी भूमिका घेतलेली आहे.साखरेच्या किमान आधारभूत किमतीमध्ये २०१९ नंतर कोणतीही वाढ झालेली नाही .त्यामुळे केंद्र सरकारने ३१ रुपये निर्धारित केलेला साखरेचा किमान आधारभूत दर हा ६० रुपये झाल्याशिवाय कोणत्याही साखर कारखान्याने साखर विकू नये अशी संघटनेची भूमिका आहे.तसेच आहे या परिस्थितीत देखील सर्व साखर कारखाने साखरेचा दर पन्नास रुपयांच्या पुढे असल्याने किमान ४ हजार ५०० रुपये पहिली उचल मिळणे अपेक्षित आहे . शेतकऱ्यांच्या आंदोलनाला साखर कारखान्याकडून उपाध्यक्ष काकासाहेब नरवडे,संचालक अशोकराव मिसाळ,दत्तात्रय काळे,कार्यकारी संचालक अनिल शेवाळे जनरल मॅनेजर रवींद्र मोटे, प्रशासकीय अधिकारी कल्याण म्हस्के यांनी आंदोलकां बरोबर चर्चा केली .
यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ तुवर, तालुका अध्यक्ष मेजर अशोक काळे ,उपाध्यक्ष बाबासाहेब नागोडे ,युवा अध्यक्ष डॉक्टर रोहित कुलकर्णी ,कायदेशीर सल्लागार एडवोकेट बाळासाहेब कावळे , प्रसिद्धी प्रमुख दादासाहेब नाबदे ,बाबासाहेब खराडे ,ताराचंद लोढे ,भास्कर तुवर ,कृष्णा यादव ,बंडोपंत चौगुले ,दत्तात्रय निकम ,किरण लंघे , संदिप पाखरे , शिवसेना महिला आघाडीच्या मीराताई गुंजाळ आदी यावेळी उपस्थित होते.


