माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात संपूर्ण उन्हाळ्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान आणि अवकाळी पावसाचा सध्याचा ट्रेंड कायम राहील असा अंदाज
भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात संपूर्ण उन्हाळ्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता देखील हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे. पुण्यात संपूर्ण
उन्हाळी हंगामात किमान आणि कमाल तापमान सामान्य पातळीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे, असे IMD च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.भारतीय हवामान विभागाने (IMD) व्हर्च्युअल पत्रकार
परिषदेद्वारे या वर्षीच्या उन्हाळी हंगामासाठी मार्च ते मे दरम्यान तापमान आणि पावसाचा अंदाज जारी केला. पत्रकार परिषदेला संबोधित करताना IMD चे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले, “मार्च ते मे दरम्यान
वायव्य, ईशान्येकडील काही भागांव्यतिरिक्त देशातील बहुतांश भागांमध्ये सामान्यपेक्षा जास्त तापमान राहण्याची शक्यता आहे. मार्च 2024 मध्ये ईशान्य द्वीपकल्पीय भारतातील बहुतांश भागात उष्णतेच्या लाटेची
शक्यता आहे. महाराष्ट्रातील अनेक भाग आणि ओडिशालगतच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचे दिवस सामान्यपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.”IMD च्या संभाव्य अंदाजानुसार,
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात संपूर्ण उन्हाळी हंगामात उष्णतेच्या लाटा जास्त प्रमाणात जाणवण्याची शक्यता आहे. विदर्भात तुलनेने कमी प्रमाणात उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे, तर कोकणात उष्णतेच्या लाटेची कमी
शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मार्चमध्ये मराठवाडा आणि राज्याच्या दक्षिण भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ
विभागातील बहुतांश भागात मार्च ते मे दरम्यान सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.