नेवासा
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर करूनही वाटप न झालेला आनंदाचा शिधा तालुक्यातील लाभार्थ्यांना त्वरित वितरित न केल्यास नेवासे तहसीलमध्ये धरणे, बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा नेवासे तालुका आम आदमी पार्टीने लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
यासंदर्भात नेवासे तहसीलदार, तसेच पुरवठा अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आनंदाचा शिधा वितरित केलेला आहे. राज्याच्या इतर भागातील जनतेला आनंदाचा शिधा वितरित झालेला असताना तालुक्यात त्याचे अद्याप वितरण झालेले नसल्याच्या तक्रारी असल्याकडे या निवेदनात संबंधितांचे लक्ष वेधण्यात आले आहे. मोठा कालावधी उलटून जाऊनही तालुक्यातील लाभार्थ्यांना याचे वितरण झालेले नाही, ही अत्यंत गंभीर बाब असून राज्य शासनाच्या उदात्त हेतूला काळिमा फासणारी असल्याची टीका निवेदनात करण्यात आली.
नेवासा तालुका आम आदमी पार्टीच्या वतीने कुठलीही पूर्वसूचना न देता आपल्या कार्यालयात लोकशाही मार्गाने धरणे, बोंबाबोंब आंदोलन करण्याचा गर्भीत इशारा आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष अॅड. सादिक शिलेदार, प्रवीण तिरोडकर, संदीप आलवणे, अण्णा लोंढे, भैरवनाथ भारस्कर, विठ्ठल मैन्दाड, सलीम सय्यद, करीम सय्यद, विठ्ठल चांडे, किरण भालेराव, सुखदेव भूमकर, सुमित पटारे, राजू महानोर, बापूसाहेब निर्मळ, बाबा वडगे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.