शेवगाव/प्रतिनिधी
शिव महापुराण कथेचे नेटके नियोजन चंद्रशेखर घुले यांनी केल्याने त्यांचा सत्कार करीत आहे. सत्काराचे हार त्यांच्या गळ्यात असेच पडावेत अशी शुभकामनासमाधान महाराज शर्मा यांनी व्यक्त केली.
लोकनेते मारुतरावजी घुले पाटील साहेब यांच्या ९४व्या जयंतीनिमित्ताने शेवगावच्या खंडोबा मैदानात सुरू असलेल्या शिव महापुराण कथा सोहळ्याच्या समारोपप्रसंगी सातवे पुष्प गुंफताना शर्मा महाराज यांनी विवेचन केले. यावेळी शिवशंभू व स्व. मारुतरावजी घुले पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले, योगी माधवबाबा, सुनिलगिरी महाराज, दत्तात्रय महाराज कुलट, उद्धव महाराज सबलस, रमेश महाराज डमाळ, सुदामदेव महाराज आदमाने, पुंडलिक महाराज लव्हाट आदींच्या हस्ते करण्यात आले.
समाधान महाराज शर्मा पुढे म्हणाले की,
भारताच्या अन् शेवगावाच्या चारही बाजूंनी महादेवाचे वास्तव्य आहे. त्यामुळे श्रध्देने शिवाची वा कोणत्याही देवाची मनोभावे आराधना करा, आपल्याला कशाचीही कमी पडणार नाही, असे सांगतानाच शिवकथाकार समाधान महाराज शर्मा यांनी मुलींच्या घटत्या जन्मदराबाबत चिंता व्यक्त केली.घुले परिवाराने शिव महापुराण कथेचे शुद्ध व पवित्र अंतकरणाने आयोजन केले. मी शिवपुराण कथा आपल्या अंतकरणात पोहोचवली, आपण तिचा विस्तार करा. शेवगावकरांनी शिवकथेवर अमाप प्रेम केले. याप्रेमाची शिदोरी घेऊन मी परतत असल्याचे ते म्हणाले.
माजी आ. डॉ.नरेंद्र घुले म्हणाले की, समाधान महाराज शर्मा यांच्या रसाळ अमृतवाणीतून आयोजित महाशिवपुराण शिवकथेस शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील संत-महंत, माता-भगिनी, तरुण, ज्येष्ठ व नागरिकांनी भरभरुन प्रतिसाद दिल्याने घुले कुटुंबीयाला प्रेरणा व बळ मिळाले. कथा समारोपप्रसंगी पावसाने हजेरी लावल्याने उपस्थितांनी आनंद व्यक्त केला. यावेळी माजी आ.चंद्रशेखर घुले पाटील,सौ. राजश्रीताई घुले पाटील,डॉ. क्षितीज घुले पाटील, विजय देशमुख, संजय फडके, सचिन लांडे, सतीश लांडे, बापुसाहेब गवळी, मनीष बाहेती, महेश शेटे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. कथेसाठी आलेल्या भाविकांना प्रसाद व शिवपार्वती दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले. प्रास्तविक दीपक कुसळकर यांनी, तर राहुल देशमुख यांनी आभार मानले.