माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये सुजय विखे यांच्या सभेत वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरातांच्या सुकन्या जयश्री थोरातांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर मतदारसंघातील
वातावरण तापलं आहे. तसेच, राज्यभरातून या वक्तव्याच्या निषेध करण्यात येत असून महिला नेत्यांनीही सुजय विखेंसह (Suay vikhe) भाजपला लक्ष्य केल्याचं पाहायला मिळत आहे. वसतंरावांनी जयश्री थोरातांवर पातळी सोडून टीका केली, त्यानंतर
फारच गदारोळ झाला. संगमनेरमध्ये आक्रमक झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी गाड्यांची जाळपोळ करण्यास सुरुवात केली. पोलीस स्टेशनबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी तब्बल 8 तास ठिय्या दिला होता. एकंदरीतच वसंतरावांच्या आक्षेपार्ह्य वक्तव्यानंतर संगमनेरमध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळालं.
याप्रकरणी, आता जयश्री थोरात यांचे वडील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ व संयमी नेते बाळासाहेब थोरात यांनी पहिली प्रतिक्रियी दिली आहे. आपल्या लेकीवर गलिच्छ शब्दात टीका केल्यानंतर संमयी नेते ओळख असलेल्या बाळासाहेब थोरात यांच्यातील बापही चांगलाच संतापल्याचं पाहायला मिळालं.
संगमनेरमधील धांदरफळ गावात झालेल्या घटनेनंतर गाड्यांची तोडफोड व जाळपोळ विरोधात भाजप देखील आक्रमक होणार असून प्राणघातक हल्ल्या विरोधात लोणी गावात निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. यात सुजय विखे देखील सहभागी होतील.
संगमनेरातील धांदरफळ गावात युवा संकल्प मेळाव्याचे बॅनर थोरातांच्या समर्थकांनी फाडले, त्यानंतर धांदरफळ गाव बंद ठेऊन निषेध करण्यात आहे. या निषेध मोर्चासंदर्भाने बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, त्यांनी सडेतोड शब्दात विखे पाटलांवर हल्लाबोल केला. सुजय
विखेनं काय आंदोलन करायचं ते करावं, जगाला सगळं माहिती आहे. सुजय विखेचं ढोंग सगळ्यांना माहितीय, त्यांनी केलेलं वक्तव्य सगळ्यांना माहितीय. त्यांच्या कार्यकर्त्यांचं वागणं हे सगळ्यांनी निषेध करावं असं आहे, अशा शब्दात बाळासाहेब थोरात यांनी विखेंच्या आंदोलनाबाबत प्रतिक्रियी दिली.
पूर्वीचं राजकारण तात्विक पद्धतीने चालायचं, मात्र गेल्या 5 वर्षात राजकारणाचा स्तर घसरलाय. भाषण कोणत्या स्तरावर करावं हे प्रत्यकाने ठरवावं. सुजय विखेंच्या कार्यकर्त्याने माझी मुलगी जयश्रीबद्दल जे गलिच्छ वक्तव्य केलेलं आहे, त्याचा महाराष्ट्रातून निषेध होतोय.
मात्र, मी महाराष्ट्राचं नेतृत्व करतोय, त्यामुळे मला माझ्या मतदारसंघातील जनतेनंच सांगितलं आहे. आम्ही इकडे आहोत, आम्ही ते पाहून घेतो, म्हणून माझे कार्यकर्तेच ते पाहून घेत आहेत, असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमधील घटनेवर भाष्य केलंय. जयश्री सोडा जगातील महिलांसंदर्भात केलेलं हे वक्तव्य आहे.
प्रत्येकाच्या घरात मुलीबाळी आहे. एकीकडे लाडकी बहीण योजना म्हणायचं आणि दुसरीकडे असे विचार ठेवायचे. संगमनेरमधील बोलणाऱ्या नेत्याच्या वक्तव्यावर स्टेजवरील नेतेमंडळी टाळ्या वाजवत होती हे दुर्दैवी आहे.
म्हणजेच त्यांच्या मेंदूत हा विचार आहे, असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी भाजपला लक्ष्य केलंय.