नेवासा
डीजे डॉल्बी लावून प्रचार करीत असल्याबाबत तसेच आवाजाच्या मर्यादाचे उल्लंघन करीत असल्याबाबत विधानसभा निवडणूकीतील काही उमेदवारांनी निवडणूक निरीक्षक यांच्याकडे तक्रार केल्याने नेवासा पोलिसांकडून ध्वनीची तीव्रता मोजण्याच्या मोहिमेचे आयोजन केल्याची माहिती पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.
ध्वनीची तीव्रता मोजण्याचे उपकरण “नॉईज लेवल मीटर” खास अहिल्यानगर येथून मागविण्यात आले असून विधानसभा निवडणूक उमेदवारांच्या प्रचाराच्या वाहनांवरील लाऊड स्पीकरच्या ध्वनीची तीव्रता मोजण्याचे काम चालू आहे. पोलीस ठाणे नेवासाच्या वतीने पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण, पो. ना. अरुण गांगुर्डे, पो. कॉ. नारायण डमाळे, भारत बोडके यांनी आज नॉईज लेव्हल मीटरचा सहाय्याने नेवासा पोलीस ठाणे हद्दीत अचानकपणे तपासणी केली.
त्यानंतर अनेक प्रचार करणाऱ्या वाहनांची पळापळ केल्याचे व धांदल उडण्याची दिसून आले. उमेदवारांना प्रचार करताना आचार संहिता पाळायची आहे व आवाजाच्या मर्यादाचे पालन करायचे आहे. आवाजाच्या मर्याद्याचे उल्लंघन होणार नाही याकडे देखील लक्ष द्यायचे आहे. परंतु अशा तक्रारी प्राप्त झाल्याने सदरची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. प्रचार संपेपर्यंत म्हणजेच 18 नोव्हेंबरच्या सायंकाळी 06 वाजेपर्यंत सदरच्या आवाजाच्या तीव्रतेचे निष्पक्षपातीपणे मोजमाप करण्याची मोहीम चालूच राहणार असून असल्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी कळवले आहे.