नेवासा
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये नेवासा मतदारसंघातून जायंट किलर ठरत विजयी झालेले आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांना राज्य मंत्रिमंडळात संधी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अब्दुल भैय्या शेख यांनी केली आहे.
याबाबत अजीत पवार यांचे निकटवर्तिय असलेले अब्दुल भैय्या शेख व कार्यकर्ते महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीसाठी आज रवाना होणार आहेत. अब्दुल भैय्या शेख व कार्यकर्ते महायुतीच्या प्रमुख नेत्यांची भेट घेणार असून आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी राज्य मंत्रिमंडळात संधी द्यावी, यासाठी निवेदनाद्वारे मागणी करणार आहेत. अब्दुल भैय्या शेख यांना नेवासा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एबी फाॅर्म प्राप्त झाला होता व त्यांनी उमेदवारी अर्जही भरला होता. मात्र, तालुक्यातून महायुतीच्या एकीचे बळ दाखवण्यासाठी अब्दुल भैय्या शेख यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तसेच निवडणुकीदरम्यान अल्पसंख्याक व ओबीसी समाजाची एकजूट करत विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत नेवासा तालुक्यात बदल घडवण्यात मोठी भूमिका बजावली आहे. अब्दुल भैय्या शेख म्हणाले, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव बघता, त्यांचा अनुभवाचा फायदा राज्याला व मतदारसंघाला होणार आहे. लंघे पाटील यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या कार्यकाळात केलेले काम बघता मंत्रिपदाच्या माध्यमातून ते नेवासा तालुक्याचा विकास घडवून आणतील. तसेच राज्यातील जनतेलाही लंघे पाटील यांच्या अनुभवाचा फायदा होणार आहे. आमदार लंघे पाटील यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असल्याने त्यांचे मंत्रिपद सर्वसामान्यांसाठी उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांना राज्य मंत्रिमंडळात संधी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अब्दुल भैय्या शेख यांनी केली आहे.