शिर्डी
कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ यांनी पहिल्यांदाच शुक्रवार दि.२३ मे रोजी शिर्डीत साईबाबांच्या सामधीचं दर्शन घेतलं. माजी खासदार समीर भुजबळ आणि विधानपरिषद सदस्य आ.पंकज भुजबळ देखील यावेळी उपस्थित होते.
साईबाबांच्या दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री भुजबळ म्हणाले की,“नाशिकच्या पालकमंत्री विषयावर वाद-विवाद वाढवण्याचं काही कारण नाही. पालकमंत्री होऊन जनतेची सेवाच करायची असते. पालकमंत्री नसलो तरी, मी जनतेची सेवा करू शकतो. त्यामुळं मला पालकमंत्री पदाच्या वादात पडायची नाही, असं मंत्री छगन भुजबळ यांनी
मंत्री पद असो किंवा नसो, लहानपणा पासूनच मी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतो. काही धार्मिक स्थळं अशी असतात की, तिथं गेल्यावर आपोआपच नतमस्तक व्हावंसं वाटतं. साईबाबा हे असंच एक स्थान आहे. त्यामुळंच आज मी त्यांच्या दर्शनासाठी शिर्डीत आलोय. नवीन जबाबदारी पार पाडताना यश मिळावं आणि जनतेची सेवा अधिक चांगल्या प्रकारे करता यावी यासाठी, साई चरणी प्रार्थना केली, असं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं.
*आरक्षणामुळं ओबीसी समजाला दिलासा*
“सुप्रीम कोर्टानं ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण दिलय. या निर्णयावर समाधान व्यक्त करत भुजबळ म्हणाले, “२७ टक्के आरक्षण मिळाल्यामुळं ओबीसी समाजाला दिलासा मिळाला आहे. मात्र या आरक्षणाचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचला पाहिजे. मात्र, या आरक्षणात चुकीचा मनुष्य घुसणार नाही, ते जनतेनं ठरवलं पाहिजे,” असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले.
*मंत्री पद येतं आणि जातं*
धनंजय मुंडे यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिल्यामुळं छगन भुजबळ यांना मंत्री पद मिळालं अशी चर्चा सुरू आहे. यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, राजकारणात आजवर मी दहावेळा मंत्री पदाची शपथ घेतली आहे. राजकारणात कधी कसं मंत्री पद येतं कधी कसं जातं. आवक जावक सुरू असते, हे चालूच राहते अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.