नेवासा
अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील इमामपूर घाटातून भक्तिमय वातावरणात ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पायी दिंडी सोहळा रविवारी पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. पंढरीपुल येथील इमामपूर घाटाचे आता ज्ञानेश्वरी घाट असे नामकरण व्हावे, अशी भावना वारकऱ्यांनी व्यक्त केली.
ज्ञानेश्वरी ग्रंथाचे रचनास्थान असलेल्या श्री. क्षेत्र नेवासा येथील ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा ‘ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष करीत मोठ्या भक्तिमय वातावरणात रविवार दि.२२ जून रोजी घाटातून मार्गस्थ झाला. सकाळी शिंगवे तुकाई फाट्यावरून पालखी निघाल्यानंतर पांढरीपूल येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखी सोहळा ठिकठिकाणी ग्रामस्थांनी जेसीबीतून फुलांचा वर्षाव करीत पालखीचे स्वागत केले.
याप्रसंगी बोलताना देविदास महाराज म्हस्के म्हणाले, अनेक दिंड्या एकत्र येऊन सुरू झालेला ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा पांडुरंगाच्या आशीर्वादाने उत्तरोत्तर वाढत जाणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी अवघ्या जगाला तत्त्वज्ञान सांगणारी ज्ञानेश्वरी जेथे लिहिली त्या ठिकाणचा पालखी सोहळा इमामपूर घाटातून मार्गस्थ होत असताना मन आनंदाने भरून आले. ज्या प्रमाणे माऊलींची पालखी दिवे घाटातून जाते, त्याच प्रमाणे ज्ञानेश्वरीचे रचना स्थान आलेले श्री क्षेत्र नेवासा येथील पालखी इमामपूर घाटातून जाते. यापुढे इमामपूर घाट हा ज्ञानेश्वरी घाट म्हणून ओळखला जावा.
या सूचनेचे गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत, राम महाराज जिंजुरके, उदयन गडाख, वारकरी व परिसरातील नागरिकांनी स्वागत केले. याबाबत वारीनंतर शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचा मनोदय वारकऱ्यांनी व्यक्त केला.