पुणे/प्रतिनिधी
पाण्याचा कार्यक्षम वापर करण्याची सध्या आवश्यकता आहे. बंदिस्त नलिकेद्वारे सिंचनासाठी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणी वापर संस्थांचा सहभाग वाढवून त्यांचे सक्षमीकरण करण्याची गरज आहे. त्यानंतरच शेतकऱ्यांचा शाश्वत विकास होईल, असे मत जलसंपदा विभागाच्या लाभक्षेत्र विकास विभागाचे सचिव डॉ. संजय बेलसरे यांनी व्यक्त केले.
यशदा येथे जलसंपदा विभागाच्यावतीने ‘सिंचन कार्यक्षमता वृद्धी-एक यशस्वी पाऊल’या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हनुमंत गुणाले, मुख्य अभियंता डॉ. हनुमंत धुमाळ, मुख्य अभियंता संजीव चोपडे, आयटीसीचे अखिलेश यादव, डॉ. भारत काकडे, डॉ. सुरेश कुलकर्णी, डॉ. मोहन शर्मा उपस्थित होते. जलसंपदा विभागातील अभियंते, पाणीवापर संस्थेचे; तसेच अनेक अशासकीय संस्थांचे पदाधिकारी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाणीवापर संस्थांना जलसंपदा विभाग मोजून पाणी देतो. त्या पाण्याचा कमी वापर केल्यास त्याबाबत शुल्क आकारणी कमी होईल. राज्यात साडेचार हजार पाणी वापर संस्था असून, त्यांचा सहभाग सक्षम कसा
करता येईल. काही सेवाभावी संस्थांचा सहभाग घेणे आवश्यक आहे. कमी पाण्यात चांगली शेती कशी करता येईल याबाबत प्रयत्न करावे लागतील, याकडे बेलसरे यांनी लक्ष वेधले.
या वेळी आयटीसी कंपनीने घोड नदी क्षेत्रातील उल्लेखनीय कामाचे सादरीकरण केले. उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर, पीकपाणी, जैवविविधता, भूजल वृद्धिकरण, रेनवॉटर हार्वेस्टिंग, प्रशिक्षण, नियोजनाचा त्यात समावेश होता.
बाएफ संस्थेचे अध्यक्ष डॉ. भरत काकडे यांनी सिंचन कार्यक्षमता वाढीच्या अनुषंगाने एकंदरीतच संपूर्ण भारतात पाणी बचत, जलसाक्षरता, मनुष्यबळाची कार्यक्षमता वृद्धिकरण, संस्थात्मक कामगिरी, पर्यावरणबदल, घटती भूजल पातळी यांबाबत सादरीकरण केले. किशोर रक्ताटे यांनी स्वातंत्र्यपूर्वकाळ ते आतापर्यंत सिंचन आणि शेतकऱ्यांची स्थिती विषद केली. प्रास्ताविक मुख्य अभियंता डॉ. हनुमंत धुमाळ यांनी केले.
सिंचनाची कार्यक्षमता सध्या ३० ते ३५ ६६ टक्के आहे. त्यात १० ते १५ टक्के वाढ केली, तर सिंचनासाठी जादा पाणी उपलब्ध होईल. त्याचा शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल. त्यासाठी काही पर्याय असून, त्याचा वापर करण्याची गरज आहे. बंदिस्त कालवा प्रणालीची सध्या अंमलबजावणी करीत आहे; तसेच सूक्ष्म सिंचनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे जास्त क्षमतेने सिंचनासाठी पाणी वापर होऊन उत्पादन वाढू शकेल.
-डॉ. संजय बेलसरे
सचिव (लाभक्षेत्र विकास),जलसंपदा विभाग