भेंडा/नेवासा
आपल्या वाटेला आलेले काम करता करता देवाची भक्ती करायची,त्यासाठी कामधाम सोडण्याची गरज नाही. आपल्या प्राप्त कर्माचा त्याग न करता ईश्वर प्राप्ती कशी करावी याची प्रेरणा सावता महाराजांकडून घ्यावी. कोणत्याही संतांना कर्मत्याग मान्य नाही असे विचार संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे विश्वस्त वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के यांनी व्यक्त केले.
नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील फुलारी वस्ती येथे २१ लाख रुपये खर्चाचे सुरू असलेल्या संत शिरोमणी सावता महाराज मंदिर उभारणी कामास श्रीक्षेत्र आळंदी येथील मिराबाई महाराज मिरीकर व संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे विश्वस्त देविदास महाराज म्हस्के यांनी भेट देऊन मंदिर उभारणी कामाची पहाणी केली. त्यावेळी भविकांशी संवाद साधताना म्हस्के महाराज बोलत होते.
नागेबाबा संस्थांनचे अंकुश महाराज कादे, ज्ञानेश्वर मंदिराचे विश्वस्त ज्ञानेश्वर माउली पवार, नामदेव निकम, सुखदेव फुलारी, कारभारी गरड,अजित रसाळ,रामकिसन गरड, डॉ.संतोष फुलारी,डॉ.रजनीकांत पुंड, पंढरीनाथ फुलारी, रावसाहेब भागवत, तुळशीदास फुलारी, ज्ञानदेव पुंड, शिवाजी फुलारी,संदीप जावळे, बाळासाहेब फुलारी, रामकिसन फुलारी,राजेंद्र फुलारी, प्रदीप फुलारी, नयन फुलारी,सचिन फुलारी,लक्ष्मण फुलारी,अशोक गव्हाणे,दत्तात्रय गव्हाणे आदि यावेळी उपस्थित होते.
महंत म्हस्के महाराज पुढे म्हणाले की, आठ महिन्या पूर्वी भूमिपूजन झालेल्या मंदिराचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. यामधून आपल्या सर्वांचे सावता महाराजांच्या आणि वारकरी संप्रदायाच्या प्रती असलेली निष्ठा दिसून येते. आपण एक पाऊल चालून गेलो तर भगवंत आपल्याकडे शंभर पावले पुढे चालून येत असतो. बळ,धन,बुद्धी आणि चातुर्य हे सर्व त्यानेच आपल्याला दिलेले आहे आपण त्याला काय देणार.
तो केवळ आपला त्याच्या प्रती असलेला भाव पाहात असतो. ज्याचे जसे सामर्थ्य आहे, भक्ती-शक्ती आहे त्यानुसार सर्वांचा सहभाग मंदिरामध्ये असावा. मंदिरे ही आपल्या धर्माची केंद्रे आहेत. धर्माचा प्रचार-प्रसाराची आणि संस्कृतीची ओळख मठ मंदिरामुळे आहे. भेंडा हे गाव अनेक गोष्टींनी प्रसिद्ध आहे यात सावता महाराजांच्या आकर्षक मंदिरामुळे भेंड्याची ओळख आणखी वाढणार आहे.
मुख्याध्यापक संदिप फुलारी यांनी मंदिर बांधकामाबद्दल सविस्तर माहिती दिली. डॉ.संतोष फुलारी यांनी आभार मानले.