अहिल्यानगर/प्रतिनिधी
अहिल्यानगर – छत्रपती संभाजीनगर या राष्ट्रीय महामार्गाची खड्डे पडून झालेली दुरावस्था व या महामार्गाच्या देखभालीची जबाबदारी असणारे जागतिक बँकेचे प्रशासनाचे दुर्लक्ष याविरोधात आज सोमवार दि.२९ रोजी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत जागतिक बँकेच्या कार्यालयास टाळे ठोकुण त्यासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले.
काँग्रेसने आंदोलन सूरु करताच आंदोलनाची तात्काळ दखल घेत कार्यकारी अभियंता यांनी दोनच दिवसामध्ये डांबराने खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले जाईल असे स्पष्ट करत अहिल्यानगर ते घोडेगाव या कामाची तातडीने वर्क ऑर्डर काढण्यात आली असून घोडेगाव ते वडाळा या दरम्यानच्या दुरुस्तीची वर्कऑर्डर दोन दिवसात काढून डांबर व खडीने खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले जाईल असे स्पष्ट केले.
यावेळी आंदोलकांनी कुठल्याही परिस्थीत मुरमाने खड्डे बुजविण्यास स्पष्ट विरोध केला व नवीन दुरूस्तीचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी केली. तसे लेखी कार्यकारी अभियंता यशवंत पाटील यांच्याकडून घेतल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले.
यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी बसपाचे हरीश चक्रनारायण यांनी नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रशासनावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी केली.
छावाचे रावसाहेब काळे यांनी याला ठेकेदार व प्रशासन तसेच सरकार देखील जबाबदार आहे. ठेकेदारांना प्रशासनाकडून पाठीशी घातल्याने ही अवस्था निर्माण झाली आहे असा आरोप केला.
या आंदोलनात काँग्रेसचे परिवहन विभागाचे जिल्हाध्यक्ष संदीप मोटे, अंजुम पटेल, विनोद साळवे, श्रीधर शेलार, दत्ता वामन, सुभाष काकडे, सुमित पटारे, इरफान शेख , संजय वाघमारे आदी उपस्थित होते.
———-
अहिल्यानगर ते वडाळापर्यंत पन्नास किलोमीटरचा महामार्ग राज्य पायाभूत विकास महामंडळाकडे देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता परंतु महामंडळाने हा मार्ग ताब्यात घेण्यास टाळाटाळ केली यामुळे दुरुस्तीचे काम विकासकास देण्यास विलंब झाला परंतु आता दोनच दिवसात डांबरीकरण सुरू केले जाईल
– यशवंत पाटील
कार्यकारी अभियंता, जागतिक बँक
——–
निर्दयी शासन व प्रशासन यांना जनतेच्या सुरक्षेचे काहीही देणेघेणे उरले नाही नागरिकांचा जीवाशी हे दोन्ही नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळत आहेत. आता यांना नागरिकांनी धडा शिकवला पाहिजे.
– संभाजी माळवदे
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी.




