अहिल्यानगर
जो ग्रंथ कितीही वेळा वाचला तरी पुन्हा पुन्हा जवळ ठेवून घ्यावासा वाटतो तोच उत्तम ग्रंथ. तसेच जे पुस्तक तुम्हाला अधिक विचार करण्यास भाग पडते ते पुस्तक जीवनात तुम्हाला अधिक सहाय्यभूत ठरते. वाचनाचे अनेक फायदे आहेत. असे प्रतिपादन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक अमोल बागुल यांनी केले.
वाचन संस्कृती वाढीस लागावी तसेच मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, विकास, जतन आणि संवर्धन व्हावे, या उद्देशाने माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी म्हणजे १५ ऑक्टोबर रोजी ‘वाचन प्रेरणा दिनानिमित्त उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय,अहिल्यानगर यांच्या वतीने “कोणत्या वयात काय वाचावे?” या विषयावरील प्रबोधनपर ऑनलाइन व्याख्यानातुन केले.
महाराष्ट्र राज्याचे ग्रंथालय संचालक श्री. अशोक गाडेकर यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी साहित्यिक -शिक्षक डॉ.अमोल बागुल बालवयापासून तर प्रौढ वयापर्यंत कोणकोणत्या ग्रंथांचे वाचन करावे, याविषयी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला.राज्यातील वाचन व ग्रंथालय चळवळीतील नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल ग्रंथालय संचालक अशोक गाडेकरयांनी माहितीपूर्ण विवेचन केले अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळ,वाचक साहित्यिक उपक्रम याबद्दल ग्रंथालय निरीक्षक रामदास शिंदे यांनी प्रास्ताविकातून माहिती दिली. सर्वकालीन उत्तम वाचनीय २०० मराठी पुस्तकांची यादी,नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियासह प्रसिद्ध जागतिक प्रकाशनांची माहिती,पुस्तकांबरोबर दैनिके,साप्ताहिके मासिके,वार्षिके तसेच दिवाळी अंकांची माहिती फेसबुक, युट्युब ,इंस्टाग्राम या समाज माध्यमांद्वारे ऑनलाइन व्याख्यानाद्वारे देण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाचन चळवळीतील ग्रंथमित्र अमोल इथापे,संदीप नन्नवरे तसेच कार्यालयातील प्रमोद गिरी संतोष कापसे, शैलेश घेगडमल, यानी विशेष परिश्रम घेतले.




