मुंबई/प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) तर्फे राबविण्यात येणाऱ्या “साथ आहे भैय्याची, योजना आपल्या हक्काची” या जनकल्याणकारी अभियानाचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते मुंबई येथे संपन्न झाले.
या अभियानांतर्गत नागरिकांना शासनाच्या विविध योजना आणि लाभ एका क्लिकवर उपलब्ध करून देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. तब्बल ५००० पेक्षा अधिक सरकारी योजना, मोफत आरोग्य कार्ड, तसेच विविध कल्याणकारी लाभ यांचा समावेश या उपक्रमात आहे.
या अभियानाचे नेवासा विधानसभा स्तरावर नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते अब्दुलभैय्या शेख करत असून ते २० हजार नागरिकांना मोफत माहिती फाईल व आवश्यक कागदपत्र संच तयार करून देणार आहेत. याशिवाय १० हजार मोफत आरोग्य कार्ड व इतर साहित्याचे वितरण आगामी काळात अब्दुलभैय्या शेख सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
कार्यक्रमास प्रांताध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक, माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक, माजी आमदार लहू कानडे,जिल्हाध्यक्ष कपिल पवार, बाळासाहेब नाहाटा,तालुकाध्यक्ष अशोक मोरे उपस्थित होते.
या वेळी बोलताना अजितदादा पवार यांनी अब्दुल शेख यांच्या कामाची व जनतेप्रती असलेल्या त्याग भावनेची दखल घेत सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नेहमी सोबत राहील. नेवासा येथील कार्यावर माझे वैयक्तिक लक्ष असून, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांत न्याय मिळेल,असे आश्वासन दिले.
कार्यक्रमात अहिल्यानगर जिल्ह्यातील आजी-माजी आमदार, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. अब्दुल शेख यांनी नेवासा नगरपंचायत व जिल्हापरिषद पंचायत समितीच्या जागा वाटप संदर्भात अजित पवार व सुनील तटकरे यांच्या समोर राष्ट्रवादीतील इच्छुकांचा अहवाल सादर केला.


