Wednesday, February 11, 2026

सत्यजित बडे यांची भारतीय प्रशासकीय सेवेत(आयएएस)निवड

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

पुणे

पुणे जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागाचे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांची भारतीय प्रशासकीय सेवेत (आय.ए.एस.) निवड झाली आहे. बडे हे भारतीय प्रशासकीय सेवेत निवड होणारे  पुणे जिल्हा परिषदेतील दुसरे माजी अधिकारी ठरले आहेत. सध्या ते रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. 

दरम्यान, याआधी पुणे जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली असून सध्या ते अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. 

सन २००० मध्ये सत्यजित बडे यांची महाराष्ट्र विकास सेवेत निवड झाली होती. तेव्हापासून आजतागायत त्यांनी विविध ठिकाणी गट विकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आदी विविध पदांवर काम केले आहे. यामध्ये सन २००२ ते २००७ या कालावधीत आंबेगाव आणि त्यानंतर सांगली जिल्ह्यातील वाळवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून काम केले आहे. सन २०१३ ते २०१७  या कालावधीत ते पुणे जिल्हा परिषदेचे तर सन २०१७ ते २०१९ या कालावधीत सातारा जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. सन २०१९ मध्ये त्यांची विकास शाखेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संवर्गात निवड झाली आणि या निवडीनंतर त्यांची वर्धा जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी निवड झाली. सन २०२२ पर्यंत त्यांनी वर्धा जिल्हा परिषदेत काम केले.  सन २०२३ पासून ते रायगड जिल्हा परिषदेचे  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.

सन १९७३ मध्ये कोल्हापूर येथे सत्यजीत बडे यांचा जन्म झाला. पुणे येथील गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्थेमधून अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. यानुसार राज्य लोकसेवा आयोगाच्या घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेद्वारे त्यांची सन २००० मध्ये विकास शाखेत गटविकास अधिकारी/ उपमुख्य कार्यकारी अधिकारी या संवर्गात निवड झाली. सत्यजित बडे यांचे वडील कै.देवीदास बडे हे उपजिल्हाधिकारी होते. त्यांनी सातारा जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी व अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. सन १९९९ मध्ये ते अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाले होते. 

दरम्यान, सत्यजित बडे यांनी गटविकास अधिकारी पदावर कार्यरत असताना विविध योजना यशस्वीरित्या राबविल्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. सन २०१२ मध्ये  ग्रामविकास विभागांतर्गत देण्यात येणारा ‘यशवंत गुणवंत अधिकारी’ हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळालेले  सर्वात कमी वयाचे ते पहिले अधिकारी आहेत‌‌. याशिवाय त्यांनी यशवंत पंचायतराज अभियानामध्ये उल्लेखनीय कामकाज केलेले आहे. शिवाय राज्य सरकारमार्फत गठीत करण्यात येणाऱ्या विविध समित्यांवर त्यांनी काम केले आहे. 

सत्यजित बडे यांची उल्लेखनीय कामगिरी 

– आंबेगाव तालुका टॅंकरमुक्त करण्यासाठी मोठे‌ योगदान. 

– आंबेगाव तालुक्यात कुपोषण निर्मूलन,संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व निर्मलग्राम अभियानाची यशस्वी अंमलबजावणी. 

– तत्कालीन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (नरेगा)वाळवा तालुक्यात (ई-मास्टर)  E-MASTER  या नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून पानंद रस्त्यांची निर्मिती. 

– वाळवा तालुक्यामध्ये इको-व्हिलेज या योजनेची प्रभावी अंमलबजावणी. 

– जिल्हा परिषद पुणे व सातारा येथे कार्यरत असताना पंचायतराज समिती व इतर महत्त्वाच्या समितीच्या नियोजनात उल्लेखनीय कामगिरी. 

– पुणे जिल्हा परिषदेतील कर्मचारी भरती प्रक्रिया व  सातारा येथे झिरो पेंडन्सी हे अभियान यशस्वीपणे राबविले. 

– सातारा  जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या बदल्यांचा  विषय अत्यंत कुशलतेने हाताळण्यात यशस्वी. 

– वर्धा जिल्हा परिषदेत विविध प्रशासकीय सुधारणा केल्या. 

– वर्धा जिल्ह्यात दिव्यांग पेन्शन योजना यशस्वीपणे राबवली.

–  कोरोना कालावधीत कोविड वॉरियर म्हणून विविध जबाबदाऱ्या यशस्वीरित्या हाताळल्या. 

–  जनावरांवरील लंपी स्कीन डिसीज या  संसर्गजन्य  रोगाचा मुकाबला यशस्वीरित्या करण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या.

– रायगड येथे विविध विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यामध्ये  मोलाचे योगदान.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!