अहिल्यानगर/प्रतिनिधी
एआय तंत्रज्ञानाद्वारे विद्यार्थ्यांना सक्षम करणार असल्याचा निर्धार जनता शिक्षण प्रसारक शिक्षण संस्थेचे विश्वस्त व शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांनी व्यक्त केला.
अहिल्यानगर जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे, अहिल्यानगर येथील लोकनेते मारुतरावजी घुले पाटील कला,वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (ए.आय.) या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे विश्वस्त व शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती डॉ.क्षितिज घुले पाटील यांच्या संकल्पनेतून अहिल्यानगर मध्ये प्रथमच ही एक दिवशीय प्रॅक्टिकल कार्यशाळा पार पडली.या कार्यक्रमाचे उद्घाटन अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निर्वाचित महापौर सौ.ज्योतीताई गाडे यांच्या हस्ते झाले.डॉ.क्षितिज घुले पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.उपमहापौर धनंजय जाधव,सौ.तेजस्विनी क्षितिज घुले पाटील,प्रशासकीय अधिकारी के. वाय. नजन, प्राचार्य डॉ. ए. के. पंदरकर, प्राचार्य डॉ.शिरीष लांडगे, संस्था समन्वयक विजय काशीद यावेळी उपस्थित होते.जागतिक महिला दिन आणि महापौरपदी निवड झाल्याबद्दल यावेळी त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. क्षितिज घुले पाटील पुढे म्हणाले की,”भविष्यात ए.आय. ही केवळ एक तांत्रिक सोय नसून ते प्रगतीचे मुख्य साधन असेल. स्वर्गीय मारुतरावजी घुले पाटील यांच्या प्रेरणेतून आमचा असा प्रयत्न आहे की,आपल्या मातीतील विद्यार्थी या तंत्रज्ञानाशी केवळ परिचित नसावा,तर त्याने याचा प्रभावी वापर करून जगाचे नेतृत्व करावे.ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांतील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देऊन त्यांना सक्षम करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.
महापौर सौ.ज्योतीताई गाडे म्हणाल्या की,
नगर जिल्ह्यात हा पहिला उपक्रम आहे. डॉ क्षितिज घुले यांच्या संकल्पनेमुळे ग्रामीण तसेच एम.आय.डी.सी. औद्योगिक वसाहतींमधील कामगारांच्या पाल्यांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे, हे घुले पाटील परिवाराचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. काळाची पावले ओळखून अशा कार्यशाळांचे आयोजन केल्यामुळे तरुण पिढी आधुनिक जगात सक्षमपणे उभी राहू शकेल.
उपमहापौरधनंजय जाधव म्हणाले,
डॉ.क्षितिज घुले यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात चांगले काम आहे . आजच्या डिजिटल युगात ‘एआय’च्या (कृत्रिम बुद्धिमत्ता) माध्यमातून विद्यार्थी अधिक सक्षम आणि प्रगत झाला पाहिजे, या उदात्त हेतूने डॉ क्षितिज घुले यांची संकल्पना कौतुकास्पद.आहे. कार्यशाळेचा विद्यार्थ्यांना फायदा होईल.
उपप्राचार्य प्रा. पी. ए. फटांगरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. ए. आय. शेख यांनी प्रमुख मान्यवरांचा परिचय करून दिला. एस. एस.लांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रा.आर.डी.म्हसे यांनी आभार मानले.


