Thursday, April 30, 2026

मढी यात्रेत भटका जोशी समाजाला मलिद्याचा मान पुन्हा मिळावा;भटका जोशी समाजाची मागणी

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
WhatsApp Image 2026-04-17 at 6.17.27 PM
previous arrow
next arrow
Shadow

पाथर्डी/प्रतिनिधी

भटक्यांची पंढरी म्हणून देशभर ओळखल्या जाणाऱ्या मढी यात्रेला होळीच्या दुसऱ्या दिवशी भटका जोशी समाजाला येथे काला प्रसाद म्हणजे मलीद्याचा पूर्वी मान होता. तो मान पूर्ववत मिळावा अशा मागणीचा ठराव
समाजाच्या मेळाव्यात करण्यात आला असून याबाबद लवकरच विश्वस्त मंडळाबरोबर चर्चा करणार असल्याची
माहिती अखिल भटका जोशी समाज सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष वामनराव मापारे यांनी दिली.

श्रीक्षेत्र मढी येथे शनिवार दि.१४ मार्च २०२६ रोजी वामनराव मापारी यांचे अध्यक्षतेखाली भटका जोशी समाजाचा राज्यवापी मेळावा संपन्न झाला. समाजाचे प्रदेशाध्यक्ष नारायण गदाई, समाधान गुराळकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र जोशी,प्रदेश सरचिटणीस बाबासाहेब महापुरे, अॅड. मुकुंद यदमळ आदींनी काल्याच्या मानपानाबाबत सविस्तर चर्चा करून माहिती दिली.राज्याच्या काना कोपऱ्यातून समाज बांधव यावेळी उपस्थित होते.

श्री.मापारी पुढे म्हणाले की, पुढील महिन्यात शिर्डी येथे राज्यस्तरीय मेळावा घेण्यात येऊन त्यानंतर आगामी वर्षाची कार्यक्रमाची धोरणात्मक रूपरेषा तयार होईल. वसंतराव नाईक भटक्या विमुक्त महामंडळावर जोशी समाजाचा प्रतिनिधी घ्यावा. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन मागणी केली जाईल. मढी येथील काला परंपरा सुरू झाल्यास समाजामध्ये सुद्धा नवचैतन्य निर्माण होऊन राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने समाज बांधव मढीमध्ये दाखल होतील. समाजातर्फे कीर्तनाचा कार्यक्रम, काला प्रसाद व समाजाची बैठक असे स्वरूप असेल. सर्वच भटक्या समाजाची एक संघटना करण्यावर आगामी काळात
प्रयत्न केले जातील.

अॅड. मुकुंद यदमळ म्हणाले, कैकाडी, गोपाळ समाजाप्रमाणे जोशी समाजाचा काल्याचा मान देवस्थान समितीने पुन्हा सुरू करावा. समाजाच्या व्यासपीठावर उदासीनता, विस्कळीतपणा, आलेला असून समाजहित व रूढी परंपरा जिवंत ठेवण्यासाठी मतभेद विसरून संघटित होण्याशिवाय पर्याय नाही. यासाठी मढीचे स्थान सर्वोत्तम असून यात्रेनिमित्त जमणारा समाज परस्परांशी भावनेने जोडला जाणार आहे. देवस्थान समितीच्या विश्वस्त मंडळाबरोबर संपर्कासाठी समाजाचे शिष्टमंडळ पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.

यावेळी रमाकांत साळवे, मुकुंद यदमळ, उद्धव काळे, विनोद दुर्वे यांना समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.

यावेळी रवींद्र गंगावणे, रमेश यज्ञेकर, समाधान गुऱ्हाळकर, पवन झुंगे, रामचंद्र गंगावणे, दादा गजरे, भाऊसाहेब गदाई , अंबादास गोंडे, शिवाजी पोटे, पिंटू वाघडकर, राजेंद्र वाघडकर,दादा गजरे आदींनी चर्चेत भाग घेतला. प्रास्ताविक बाबासाहेब महापुरे यांनी प्रास्ताविक केले. नारायण गदाई यांनी सूत्रसंचालन केले.राजेंद्र जोशी यांनी आभार मानले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!