नेवासा/प्रतिनिधी
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अवकाळी पाऊस, वादळी वारा व गारपीटमुळे झालेल्या भीषण शेती पिकांचे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून विशेष आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडे केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात श्री.लोखंडे म्हणाले की, शिर्डी लोकसभा मतदारसंघातील श्रीरामपूर, राहुरी, संगमनेर, अकोले, राहाता व नेवासा या तालुक्यांमध्ये मंगळवार, बुधवार व गुरुवार दरम्यान अवकाळी पाऊस, तीव्र वादळी वारे व गारपीट झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या उभ्या तसेच काढणीस आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून संपूर्ण परिसरात हतबलतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेषतः द्राक्ष, आंबा, डाळिंब, टरबूज या फळपिकांसह गहू, हरभरा व चारा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी पिके पूर्णतः आडवी पडली असून, काढणीस आलेली गहू पिके अक्षरशः जमीनदोस्त झाली आहेत. अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण हंगामाचे उत्पन्न या आपत्तीमुळे नष्ट झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार श्रीरामपूर तालुक्यातील ३२ गावांमध्ये सुमारे १,०५६ हेक्टर क्षेत्रावरील ३३% पेक्षा जास्त पिकांचे नुकसान, नेवासा तालुक्यातील १७ गावांमध्ये ४५२ हेक्टर क्षेत्रावरील ४५२ शेतकरी बाधित, राहाता तालुक्यातील १७ गावांमध्ये ८७७ शेतकरी व ५४६ हेक्टर क्षेत्र बाधित, संगमनेर तालुक्यातील १८० शेतकऱ्यांचे सुमारे १२७ हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून शेतकरी वर्ग आर्थिकदृष्ट्या पूर्णतः कोलमडून पडला आहे. त्यामुळे या संकटातून त्यांना त्वरित दिलासा मिळणे अत्यावश्यक आहे.
तरी सर्व संबंधित तालुक्यांमध्ये तात्काळ व अचूक पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत. बाधित शेतकऱ्यांना शासन नियमांनुसार नव्हे तर विशेष बाब म्हणून वाढीव नुकसानभरपाई जाहीर करावी, फळबाग व बहुवर्षीय पिकांसाठी स्वतंत्र विशेष पॅकेज जाहीर करावे, शेतकऱ्याचे पीककर्ज तात्पुरते स्थगित करून व्याजमाफीचा निर्णय घ्यावा, विमा कंपन्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्याचे निर्देश देऊन या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन शेतकरी बांधवांना न्याय व दिलासा द्यावा अशी मागणी श्री.लोखंडे यांनी केली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,जिल्हाधिकारी,अहिल्यानगर यांना ही या पत्राच्या प्रति पाठविण्यात आल्या आहेत.



