नेवासा/प्रतिनिधी
नेवासा फाटा येथील तीन हॉटेल व लॉजवर पोलिसांनी संयुक्त छापा टाकून वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या हॉटेल मालक, मॅनेजर व ग्राहकांसह १० जणांवर ‘पिटा’ (PITA) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबद पोलिस निरीक्षक सागर ढिकले यांनी दिलेल्या अधिक माहिती अशी की, अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशांन्वये व मिळालेल्या गुप्त माहितीवरून अप्पर पोलीस अधीक्षक श सोमनाथ वाकचौरे, वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव आणि नेवासा पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने नेवासा फाटा येथील तीन लॉजवर मोठी कारवाई केली आहे.
दि. ०९/०५/२०२६ रोजी नेवासा फाटा हद्दीतील तिरंगा लॉज, मित्रप्रेम आणि नामगंगा लॉजमध्ये महिलांकरवी कुंटणखाना चालवला जात असल्याची माहिती वरिष्ठांकडून प्राप्त झाली होती. या माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांच्या पथकाने डमी ग्राहक तयार करून त्यांना प्रत्येकी ५०० रुपयांच्या नोटा देऊन या तीनही ठिकाणी पाठवले. डमी ग्राहकांचा इशारा मिळताच पोलिसांनी एकाच वेळी तिरंगा हॉटेल, मित्रप्रेम हॉटेल आणि नामगंगा हॉटेल येथे धाड टाकली.
या छाप्यात हॉटेल मालक आणि मॅनेजर हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पिडीत महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून बळजबरीने देहविक्री करवून घेत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून डमी ग्राहकांना दिलेल्या ५०० रुपयांच्या नोटा आणि इतर आक्षेपार्ह साहित्य जप्त केले आहे. या कारवाई दरम्यान अडकलेल्या ११ पिडीत महिलांची सुटका करण्यात आली असून त्यांना पुढील कारवाईसाठी नेवासा पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.
या प्रकरणी प्रकाश शेंडगे (हॉटेल मालक, रा. नेवासा खुर्द), इक्बाल अबुल मंडाल (हॉटेल मॅनेजर, रा. कल्याण, जि. ठाणे), सचिन कोळेकर (हॉटेल मालक, रा. नेवासा), सुरेश बन्सी कांबळे (हॉटेल मॅनेजर, रा. मुकींदपूर, ता. नेवासा), अजय कोळेकर (हॉटेल मालक), अजित सुभाष बर्डे (हॉटेल मॅनेजर, रा. मक्तापूर, ता. नेवासा) तसेच
वेश्याव्यवसायाला प्रोत्साहन देणारे ग्राहक अमोल एकनाथ पारखे (रा. वायगाव, ता. गंगापूर),दिपक बाबासाहेब शिंदे (रा. वडाळा, ता. नेवासा), प्रणव नवनाथ नजन रा. माळी चिंचोरा,ता. नेवासा,दिपक रघुनाथ वांदेकर, बेलापूर तालुका नेवासा
यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत महिलांना पैशाचे आमिष दाखवून बळजबरीने वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला असून गुन्हा रजिस्टर क्रमांक 363/2026 भारतीय न्याय संहिता कलम 143 सह स्त्रीया व मुली यांचे अनैतिक व्यापारास (प्रतिबंध) कायदा 1956 (PITA) चे कलम 3, 4, 5, 7, 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पो.नि. संतोष मुटकुळे , पो. नि. सागर ढिकले सपोनि रामहरी खेडकर, सपोनि अमोल पवार, पो उप नि विकास पाटील, पो. हवा. संदीप आव्हाड, पो. शि. राहुल खेडकर, पोशि संपत खेडकर, पोशि भगवान सानप, पोशि शाम गुंजाळ, पोशि देविदास तांदळे, मपोशि प्रियंका शिरसाठ. सफौ नागरगोजे, पोहवा राठोड, पोना काळोखे, पोना किरण पवार, पोशि गंगावणे, मपोशि जाधव, पोशि जाधव. यांनी ही कारवाई केलेली आहे.
हॉटेल चालक व ग्राहक यांना ताब्यात घेण्यात आले असून, हॉटेल मालकांचा शोध सुरू आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक सागर ढिकले करत आहे.


