Monday, July 27, 2026

ज्ञानवर्धिनी सेंट्रल स्कूलच्या ‘ज्ञानवर्धिनी संस्कार वारी’ने तांभेरे नगरी झाली भक्तिमय

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

गुहा: पत्रकार राहुल कोळसे:ज्ञानवर्धिनी सेंट्रल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, गुहा यांच्या वतीने आज, दि. २४ जुलै २०२६ रोजी आषाढी एकादशीचे औचित्य साधून ‘ज्ञानवर्धिनी संस्कार वारी’ अर्थात भव्य पायी दिंडी सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन श्रीक्षेत्र तांभेरे येथील श्रीराम मंदिर प्रांगणात करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण गावातून ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली. या भक्तिमय सोहळ्याने तांभेरे नगरी विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेली.

या दिंडीमध्ये शाळेतील शेकडो विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. संतपरंपरा, भारतीय संस्कृती आणि सामाजिक मूल्यांचा संगम असलेल्या या वारीने उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाला तांभेरे गावचे सरपंच डॉ. उमेश मुसमाडे, श्रीराम जन्मोत्सव यात्रा समितीचे अध्यक्ष यशवंत मुसमाडे, सचिव बिभीषण गागरे, उद्योजक सोमेश्वर शिरसागर, माजी सैनिक मेजर ताराचंद गागरे, संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. हराळ सर व सौ. हराळ मॅडम, संस्थापक माजी मुख्याध्यापक वसंतराव जाधव, प्रभाकर शेलार, शहाजी शेलार, पंढरीनाथ मुसमाडे, मनोज मुसमाडे, रवींद्र मुसमाडे तसेच समस्त ग्रामस्थ, पालक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिंडीचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी साकारलेल्या संतांच्या वेशभूषा. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ, सोपानदेव आदी संतांचे जिवंत दर्शन घडविणाऱ्या बालचमूंनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. टाळ, मृदंग, वीणा आणि हरिनामाच्या गजरात “जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, ज्ञानबा-तुकाराम” या नामघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.

ग्रामस्थांनी दिंडीचे ठिकठिकाणी रांगोळ्या काढून, औक्षण करून आणि फुलवृष्टी करत उत्स्फूर्त स्वागत केले. विद्यार्थ्यांनी “भक्त पुंडलिक भेटी पांडुरंग” या विषयावरील नाटिका तसेच विठ्ठलभक्तीवरील गीतांवर आकर्षक नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेले लेझीम पथक, वृक्षसंवर्धन, स्वच्छता अभियान, शिक्षणाचे महत्त्व, शेतकरी सन्मान आणि भारतीय संस्कृती यांसारख्या विषयांवरील जनजागृतीपर फलक व संदेश विद्यार्थ्यांनी सादर केले. त्यामुळे ही वारी केवळ धार्मिक न राहता सामाजिक संस्कारांची व पर्यावरण संवर्धनाची जनजागृती करणारी ठरली.

यावर्षीचा विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थी हर्षल गाडे याने साकारलेले भगवान श्री विठ्ठलाचे रूप आणि विद्यार्थिनी भक्ती उऱ्हे हिने साकारलेली श्री रुक्मिणीची वेशभूषा. तसेच लहान बालगोपाळांनी सादर केलेले भव्य रिंगण आणि हरिनामाचा अखंड गजर उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला. विठ्ठल-रुक्मिणीची पालखी शाळेच्या ट्रॅक्टरमधून गावभर मिरविण्यात आली.

या प्रसंगी श्रीराम जन्मोत्सव यात्रा समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. सरपंच डॉ. उमेश मुसमाडे यांनी केळीच्या स्वरूपात प्रसाद दिला, तर शाळेचे पालक इंजिनिअर रवींद्र संसार यांनी सर्व बालगोपाळांसाठी साबुदाणा खिचडीचा प्रसाद उपलब्ध करून दिला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे प्राचार्य अरुण पारखे, प्राचार्य सागर कडू, समन्वयक औदुंबर कडू, महिला समन्वयक दिपाली खरडे, कांचन साठे, जयश्री पागिरे, केतकी ईश्वरकर, ज्योती विश्वकर्मा, स्वप्निल कडू, रवींद्र गागरे, सौरभ वरखडे, चंद्रकांत कदम, शितल जाधव, स्वाती कदम, राजश्री भांड, अमोल साळुंखे, विकास सौदागर, नामदेव कोळसे, सोमनाथ नरोडे, सुनील मुसमाडे, राजू माळी, दत्तू चौधरी आणि सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष मा. ज्ञानदेव शेलार यांनी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांचे स्वागत करून प्रस्ताविक केले. कार्यक्रमाच्या समारोपावेळी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानदेव शेलार व सचिव मनीषा शेलार यांनी सर्व मान्यवर, ग्रामस्थ, पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

ज्ञानवर्धिनी सेंट्रल स्कूलच्या या ‘ज्ञानवर्धिनी संस्कार वारी’ने विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, संस्कार, सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान जागविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले असून, तांभेरे नगरीत हा सोहळा दिवसभर चर्चेचा विषय ठरला.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!