गवताळ प्रदेशाचा दुर्मिळ सम्राट-माळढोक
लांब पाय, मजबूत शरीर आणि डोक्यावर काळा मुकुट असलेला हा देखणा पक्षी आपल्या गवताळ प्रदेशाचा गौरव आहे. सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यांतील माळराने हा या दुर्मिळ पक्ष्याचा ऐतिहासिक अधिवास आहे.
माळढोक (शास्त्रीय नाव: Ardeotis nigriceps) हा भारतात आणि भारताला लागून असलेल्या पाकिस्तानमधील कोरड्या प्रांतामध्ये आढळणारा अत्यंत दुर्मिळ पक्षी आहे. या पक्ष्याच्या सरंक्षणासाठी अनेक राज्य सरकारांनी ठोस पावले उचलली आहेत. याला इंग्रजीत ‘ग्रेट इंडियन बस्टार्ड म्हणतात. विदर्भात या पक्ष्याला ’हुम’ म्हणतात.
*माळढोक…
मोठे, उभे शरीर, उंच पाय यामुळे हा पक्षी शहामृगासारखा दिसतो. उडणाऱ्या पक्ष्यांमधील सर्वांत जड पक्ष्यांपैकी हा एक आहे. भारताच्या कोरड्या माळरानांवर एकेकाळी सहज दिसणाऱ्या ह्या पक्ष्यांची संख्या इसवी सन २०११मध्ये केवळ २५० इतकी असल्याचा अंदाज करण्यात आला होता. २०१८मधे ही संख्या १५० वर आली आहे. शिकार आणि अधिवासाचा ऱ्हास यामुळे ही प्रजाती अतिशय संकटग्रस्त स्थितीत आहे. हा पक्षी सन १९७२ च्या वन्यजीव संरक्षण अधिनियमअन्वये संकटग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला आहे. याचे मुख्य खाद्य छोटे व मोठे किडे, टोळ, बिया, छोटी झुडुपे, इत्यादी आहे.
कुठे आढळतो…
माळढोक पक्षी भारतामधे फक्त आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र व राजस्थान या राज्यांत आढळतो. महाराष्ट्रात हा पक्षी साधारणपणे दुष्काळी जिल्ह्यांमध्ये म्हणजे अहमदनगर, नागपूर व बीड जिल्ह्यात तसेच सोलापूर जिल्ह्यात आढळतो. सोलापूरजवळ नान्नज अभयारण्य येथे या पक्ष्यासाठी संरक्षित अरण्य स्थापन झाले आहे. हे महाराष्ट्रातील आकाराने सर्वात मोठे अभयारण्य आहे.
-सुखदेव फुलारी (अध्यक्ष,निसर्ग मित्र फाउंडेशन)


