Tuesday, November 24, 2026

अहिल्यानगरमध्ये २७ नोव्हेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान पुरस्कार वितरण सोहळाव सरपंच महासंवादाचे।आयोजन

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर, दि. २३

ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास, ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण आणि गावांना विकासाच्या शाश्वत मार्गावर नेण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६’ अंतर्गत नाशिक विभागाची विभागस्तरीय कार्यशाळा, पुरस्कार वितरण सोहळा तसेच ‘दुष्काळावर मात आणि समृद्ध गावांचा संकल्प’ या विषयावरील सरपंच परिसंवादाचे आयोजन शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी अहिल्यानगर येथे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी १० वाजता द्वारका लॉन, नेप्ती चौक, बायपासजवळ, नगर-कल्याण रोड, अहिल्यानगर येथे होणार आहे. या कार्यक्रमाला विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री डॉ. योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच नाशिक विभागातील सर्व खासदार, आमदार, ग्रामविकास विभागाचे सचिव, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

*पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींचा होणार गौरव…

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून गावपातळीवर विकासाची विविध कामे प्रभावीपणे राबविणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देण्यात येत आहे. या अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नाशिक विभागातील पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींचा या सोहळ्यात सन्मान करण्यात येणार आहे. या पुरस्कारांमुळे ग्रामपंचायतींच्या विकासकामांना प्रोत्साहन मिळण्याबरोबरच इतर ग्रामपंचायतींनाही उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा मिळणार आहे.

*दुष्काळमुक्त आणि समृद्ध गावांच्या निर्मितीवर विचारमंथन…

अहिल्यानगरसह नाशिक विभागातील अनेक भागांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना, जलसंधारण, पाण्याचे नियोजन, लोकसहभागातून जलव्यवस्थापन, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन आणि गावांच्या आर्थिक समृद्धीसाठी आवश्यक उपाययोजना या विषयांवर सरपंच परिसंवादात विचारमंथन होणार आहे.

गावाच्या विकासात सरपंच आणि ग्रामपंचायतींची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, स्थानिक गरजा ओळखून विकासाचे नियोजन करणे, उपलब्ध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि ग्रामस्थांच्या सहभागातून विकासकामे पूर्ण करणे याबाबत या परिसंवादातून मार्गदर्शन मिळणार आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करून प्रत्येक गाव स्वयंपूर्ण, जलसमृद्ध आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक विचारांची देवाणघेवाण होणार आहे.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला गती देणे, गावांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण करणे आणि विकासाच्या विविध निकषांवर ग्रामपंचायतींची कामगिरी उंचावणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

या विभागस्तरीय कार्यशाळा, पुरस्कार वितरण सोहळा आणि सरपंच परिसंवादाच्या माध्यमातून नाशिक विभागातील ग्रामपंचायतींच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आनंद भंडारी यांनी व्यक्त केला आहे. या कार्यक्रमास नाशिक विभागातील सर्व सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी आणि संबंधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!