अहिल्यानगर/सुखदेव फुलारी
राज्यातील सहकारी साखर कारखाने सुरू राहण्यासाठी सहकार विभाग व राज्य सहकारी बँकेने एकत्रित अभ्यास करून मॉडेल तयार करणेकरीता।साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने
याबाबत दि.२३ नोव्हेंबर रोजी शासन निर्णय जारी केला आहे.त्यात म्हंटले आहे की,।राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची सद्यस्थितीबाबत विचार करताना, राज्यात २००० च्या दशकात एकूण २०० पेक्षा जास्त सहकारी साखर कारखाने कार्यरत होते. मागील २५ वर्षांत प्रत्यक्ष गाळप करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांची संख्या १०० च्या आत आलेली आहे. आर्थिक अडचणीत आलेले सहकारी साखर कारखाने अवसायनात घेतलेले असुन त्यापैकी काही कारखाने विक्री झालेले आहेत, काही कारखाने बंद अवस्थेत आहेत. तर ३० ते ३२ सहकारी कारखाने खाजगी व्यवस्थापनामार्फत भाडेतत्वावर अथवा सहयोगी तत्वावर चालविण्यात येत आहेत.
त्यामुळे, स्वबळावर गाळप हंगाम घेणाऱ्या सहकारी कारखान्यांची संख्या प्रत्यक्षात ७५ च्या आसपास राहिलेली आहे. मागिल २ वर्षात शासन हमीवर
एनसीडीसी मार्फत ३३ सहकार कारखान्यांना अर्थ सहाय्य प्राप्त झाले नसते तर ही संख्या अजूनही कमी झाली असती. अर्थात अर्थसहाय्य मिळाल्यानंतर देखील सदर कारखान्यांची परिस्थिती पुर्णपणे सक्षम झालेली नाही. या अनुषंगाने महाराष्ट्रासारख्या सहकार चळवळीतील अग्रेसर राज्यामध्ये राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची ही परिस्थिती होण्यामागची कारणमिमांसा आणि करावयाच्या उपाययोजना याबाबत सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने सुरू ठेवण्याच्या व त्यांचेमध्ये आर्थिक सक्षमता निर्माण करण्याच्या अनुषंगाने सहकार विभागाने व महाराष्ट्र राज्य सहकारी विकास बँक यांनी एकत्रित अभ्यास करून मॉडेल तयार करणेकरीता साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याच्या बाब शासनाच्या विचाराधीन होती.
राज्यातील सहकारी साखर कारखाने सुरु राहण्यासाठी सहकार विभागाने व राज्य सहकारी बँकेने एकत्रित अभ्यास करुन मॉडेल तयार करण्याकरीता साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
*सदर समितीची रचना खालीलप्रमाणे राहील….
साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे
(अध्यक्ष), सहकार आयुक्त तथा निबंधक, सहकारी संस्था, पुणे (सदस्य),प्रशासक/व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य सहकारी विकास बँक मर्या., मुंबई(सदस्य),वसंतदादा शुगर इंस्टिट्युट यांचे प्रतिनिधी (सदस्य),रिझर्व बँक ऑफ इंडिया यांचे प्रतिनिधी सदस्य),नाबार्डचे प्रतिनिधी(सदस्य),महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे प्रतिनिधी(सदस्य),वेस्ट इंडियन शुगर मिल असोसिएशनचे प्रतिनिधी(सदस्य),राज्यातील सहकारी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी(सदस्य),
राज्यातील खाजगी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी(सदस्य),शासन नियुक्त साखर उद्योगातील ०२ तज्ञ व्यक्ती(सदस्य),ऊस संशोधन केंद्राचे प्रतिनिधी(सदस्य),ऊस बियाणे निर्मिती विषयातील तज्ञ (सदस्य).
या व्यतिरिक्त शासन नियुक्त साखर उद्योगातील ०२ तज्ञ व्यक्तींच्या नावाची शिफारस साखर आयुक्त यांनी शासनास करावी. तसेच समितीमध्ये आमंत्रित सदस्य बोलविण्याचे अधिकारी साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना देण्यात येत आहेत.
*समितीची कार्यकक्षा:–
सदर समितीने सहकारी साखर कारखाने सुरू राहण्याकरीता येणाऱ्या आर्थिक अडचणी तसेच इतर अडचणींची कारणमिमांसा करून कारखान्यांच्या परिस्थितीत सुधारणा करण्याच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना करणेकरीता खालील नमुद मुद्यांबाबत अभ्यास करून शासनाला सविस्तर अहवाल व शिफारशी सादर कराव्यात.
अ) ऊस विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून ऊस उत्पादकता वाढविणे व साखर उतारा वाढविणेकरीता खालील बाबींबर भर देणे….
l. बियाणे साखळी व उती संवर्धन विकास.
॥. बियाणे कायदा १९६६ ची अंमलबजावणी व गुणवत्ता नियंत्रण.
lII. आधुनिक तंत्रज्ञान (AI, GPS व ड्रोन) व यांत्रिकीकरण चा वापर.
IV. मृदा आरोग्य व सूक्ष्म सिंचन (Drip Irrigation).
V. पक्वतेनुसार ऊस तोडणी व पर्यायी पिके (इथेनॉल) लागवडीस तसेच पीक फेरपालट (Crop Rotation) करण्यास प्रोत्साहन देणे.
VI. चांगल्या गुणवत्तेचा ऊस निर्माण करणे व साखर कारखान्याचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने शर्करा आधारित ऊस दर प्रणालीच्या अंमलबजावणीचा आराखडा तयार करणे.
VII. गाळप क्षमता व गाळप कालावधी यांची सांगड घालण्यासाठी नेमलेल्या अभ्यास गटाचा अहवाल प्राप्त करून कार्यवाही करणे.
VIII. झोनबंदीच्या पार्श्वभूमीवर जास्त अंतरावरून ऊस आणण्याबाबत निकष तयार करणे व त्यासाठी येणाऱ्या खर्चाची जबाबदारी निश्चित करणे.
IX. संयुक्त उपसा जलसिंचन योजना (Lift Irrigation Scheme) व ठिबक सिंचन पाणी पुरवठा पध्दती (Drip Irrigation System) सुरू करणे.
ब) साखर आयुक्तालयाचे सक्षमीकरणः—
साखर उद्योगास “ऊर्जा संकुल” म्हणून विकसीत करणे व राष्ट्रीय उद्दिष्टांनुसार “संकल्प २०४७” च्या उद्दिष्टांची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने साखर आयुक्तालयाचा सुधारित आकृतीबंध व पदनिर्मितीचा प्रस्ताव तपासून शिफारस करणे.
क) उपपदार्थ धोरण निश्चित करणे व साखर उद्योगांमध्ये उपपदार्थांच्या निर्मितीमधून उत्पन्नात वाढ करणे:–
CBG, १G व २G इथेनॉल, मल्टी-फीड डिस्टिलरी, शाश्वत विमान इंधन (SAF), सहवीज (Co-gen), सौर ऊर्जा (Solar Energy), हरित हायड्रोजन (Green Hydrogen), जैव-रसायने (Bio-Chemicals) व जैव-बिटुमेन (Bio-bitumen) या १० उपपदार्थांच्या निर्मितीसाठी एकात्मिक बायो-रिफायनरी मॉडेल (Zero Waste Model) तयार करणे व या करीता केंद्र शासन २०%, राज्य शासन १०% व कारखाना ७०% या वित्तीय पॅटर्नची व्यवहार्यता तपासणे.
ड) सहकारी साखर कारखान्यांचे पुनरुज्जीवनः–
आर्थिक अडचणीतील सहकारी साखर कारखान्याने आर्थिकदृष्ट्या सक्षम करणेकरीता व त्यांचे पुनरुज्जीवन करणेकरीता तसेच उपरोक्त उप उत्पादने निर्माण करण्यासाठी करावयाची संभाव्य गुंतवणूक विचारात घेवून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या मदतीने खालील बाबींबाबत कार्यवाही करणे.
a. कारखानानिहाय आर्थिक व्यवहार्यता तपासणे
b. प्रत्येक हंगामासाठी स्वतंत्र कॅश क्रेडिट कर्ज खाते
c. त्या त्या हंगामातील कर्ज पुढील हंगाम सुरू करणेपूर्वी पूर्णतः परतफेड करणे अनिवार्य करणे
d. एस्क्रो खाते
e. कर्ज परतफेडीत विलंब (Moratorium)
f. कर्ज पुरवठा व कर्ज वसुली धोरण ठरविणे
g. गुंतवणूक करताना बाह्य गुंतवणूकदार कंपन्या व स्वः हिस्सा ठरविणे
h. कर्ज घेतलेल्या कारखान्यांवर संनियंत्रण करणारी यंत्रणेची निर्मिती
i. पुनरुज्जीवन किंवा पुनर्वसन निधीची निर्मिती
j. आर्थिक अडचणीत असलेल्या (NPA) सहकारी साखर कारखान्यांसाठी रिझर्व बँकेच्या मदतीने पुनरूज्जीवन व कर्जनिराकरण आराखडा तयार करणे.
k. राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) मार्फत भांडवली सहाय्य याबाबत धोरण निश्चित करणे.
२) समितीने दिनांक १२.१०.२०२६ रोजीच्या बैठकीच्या इतिवृत्तानुसार कार्यवाही करून आपला सविस्तर अहवाल व शिफारसी शासनास २ महिन्यांच्या आत सादर कराव्यात.


