अहमदनगर दि. २७ जानेवारी
जिल्हयाच्या सर्वच भागात बिबटयाचा वावर असून ऊसाची शेती हे बिबट्याचे प्रामुख्याने अधिवास बनलेले आहे. सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरु झाला असून मागील १० ते १५ दिवसात जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी तीन लहान बालकांना बिबट हल्यामध्ये आपला जिव गमवावा लागला आहे. त्यामुळे ऊसतोड करत असताना शेतकरी व मजुरांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन आवाहन उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीमध्ये ऊसतोड हंगाम सुरु असून ऊसतोड सुरु असताना मजुरांनी व संबंधीत शेतकऱ्यांनी आपल्या लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे. अनेकदा त्यांना ऊसतोड सुरू असलेल्या भागातच खेळायला मोकळे सोडले जाते. ज्या ठिकाणी मुलांना ठेवले जाते तिथे हातात घुंगराची काठी घेऊन मोठ्या व्यक्तीस थांबवावे. जेणेकरून बिबटया दिसल्यास मुलांची सुरक्षा करता येते. खुप वाकुन ऊसतोड करु नये. अश्या वेळी दुसराच एखादा प्राणी आहे असे समजून बिबट्याचा पाठमोरा हल्ला होऊ शकतो. ऊसतोड सुरु असताना ट्रक्टर मधील टेपरेकॉर्डरवर किंवा चांगल्या वायरलेस ब्लूटूथ स्पीकरचा वापर करुन मोठया आवाजात गाणी सुरु ठेवावीत यामुळे बिबट्या जवळ येण्याची शक्यता कमी होते. ऊसतोड किंवा शेतीची कामे करत असतांना समुहाने कामे करावी. एकटया व्यक्तीने ऊसतोड किंवा शेतीची कामे करु नयेत. गावाजवळ, जंगलात, शेतात अथवा गावठाण हद्दीत बिबट दिसल्यास बघण्यास गर्दी करु नये.
बिबट तसेच बिबट्याची पिल्ले आढळल्यास तात्काळ सबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी याच्याशी संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.