नेवासा
संतांच्या संगतीत राहून चांगल्या आचरणाद्वारे मनुष्य जीवाचा उद्धार करा असे आवाहन साध्वी कु.आरतीताई शिंदे यांनी भागवत कथेच्या चौथे पुष्प गुंफतांना केले.
नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील शिनाई मंदिर प्रांगणात सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथेमध्ये रविवारी रात्री श्रीकृष्ण जन्म सोहळा साजरा करण्यात आला. भागवत कथेच्या चौथे पुष्प गुंफतांना त्या बोलत होत्या.
तीर्थक्षेत्र शिनाई देवस्थानचे महंत १०८ गुरुवर्य श्री दिगंबर बाबाजी आराध्य, प्रमुख महंत आवेराज बाबाजी महाराज व श्री क्षेत्र देवगड संस्थानचे महंत भास्करगिरीजी महाराज यांच्या आशिर्वादाने व ज्योतिषचार्य महंत आवेराज बाबाजी आराध्य यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दि.२५ जानेवारी २०२४ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत सायंकाळी ६ ते ९ यावेळेत ही कथा सुरू आहे.
कथेच्या चौथ्या दिवशी हजारो भाविकांनी श्रीमद भागवत कथा श्रवणासाठी शिनाई मंदिर प्रांगणात मोठी गर्दी केली. यामध्ये महिला भगिनींची संख्या लक्षणीय अशी होती.चौथ्या दिवशी झालेल्या कथेमध्ये साध्वी आरतीताई शिंदे यांनी जड भरत,प्रल्हाद चरित्र सांगितले.या प्रसंगी
भक्त प्रल्हादाची भक्ती, हिरण्यकशप्पू, नृसिंह अवतार हा प्रसंगी अभियानाद्वारे सादर करण्यात आला.त्यानंतर झालेल्या श्रीकृष्ण जन्म सोहळयाच्या प्रसंगाने तर भाविक आकर्षित होऊन राधे राधेचा जयघोष करत मंत्रमुग्ध ही झाले होते.
यावेळी झालेल्या श्रीकृष्ण जन्म सोहळयामध्ये वासुदेवची भूमिका साकारणाऱ्या व्यक्तीने टोपलीत बसवून छोट्या बालकाला सजवून आणले होते.कथा व्यासपीठावर पुष्पांनी पाळणा सजविण्यात आला होता.”किती सांगू मी सांगू कुणाला,आज आनंदी आनंद झाला”या गीतावर उपस्थित हजारो भाविकांनी धरलेला ठेका वातावरण राधाकृष्णमय करून गेला.
यावेळी बोलताना भागवत कथाकार साध्वी कु.आरतीताई शिंदे म्हणाल्या की, आज पारमार्थिक संस्कार आजच्या युवा पिढीमध्ये झाले पाहिजे,मिळालेल्या संस्काराने जीवनात जागृती प्रदान होते,पापातून मुक्त होण्यासाठी गोमातेला व श्वानाला रोटी द्या,अंतकाळी प्रभू नामाचे स्मरण केले तर तो व्यक्ती धामाला प्राप्त होतो त्यामुळे संतांच्या शब्दावर विश्वास ठेवून जीवनात आचरण करा,भगवंत चिंतनाने व संतांच्या संगतीत राहून मनुष्य जीवाचा उध्दार करा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.
भानसहिवरा येथील स्थानिक कलाकारांनी वरील सर्व पात्रे मेहनत घेऊन साकार केली. त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भगवान श्रीकृष्ण परमात्म्यासह छत्रपती शिवरायांची आरती करण्यात आली.यावेळी तुषार महाराज,माजी सरपंच देविदास साळुंके, डॉ.बाळासाहेब कोलते,डॉ. बाळासाहेब आरेकर, बाळासाहेब भणगे, ऋषिकेश शेटे,प्रीतम साळुंके यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते.पोपटराव शेकडे यांनी सूत्रसंचालन केले.उपस्थित भाविकांना व्यापारी देविदास साळुंके यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.