नेवासा
प्रसिद्ध सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी रविवारी सकाळी शनिशिंगणापूर येथे शनिदर्शन घेतले. चौथऱ्यावर जावून शनिदेवास तेलाभिषेक केला.
देवस्थान कार्यालयात यावेळी कोषाध्यक्ष दीपक दरंदले, शिंगणापूरचे पोलिस पाटील सयाराम बानकर, विश्वस्त शेटे यांनी अभिनेत्री शेट्टी यांचा सत्कार केला. गेल्या तीन दिवसांपासून सलग सुट्ट्यांमुळे शिंगणापूरला भाविकांचा ओघ वाढला आहे. शुक्रवारी दुपारपासून तसेच शनिवारी सकाळपासून ते रात्रीपर्यंत भाविकांची गर्दी झाली होती. रविवारीही भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. सकाळी अकरा वाजता हिंदी चित्रपट अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी दर्शन घेतले. दुपारनंतर भाविकांची गर्दी वाढत गेली. काल शनिवारी व आज रविवारी शिंगणापूर मार्गावर घोडेगाव व राहुरी मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली होती. त्यामुळे वाहतूक कोंडीत वाहने अनेकदा खोळंबली होती. देवस्थानच्या प्रसादालयातही गर्दीचा ओघ होता. पानसतीर्थ सुशोभीकरण प्रकल्प बघून अनेक भाविक सेल्फी घेत होते. देवस्थान अध्यक्ष भागवत बानकर व मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदले यांनी आजच्या गर्दीच्या नियोजन पार्श्भूमीवर कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या होत्या.