नागपूर
महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्री बाई फुले या दांपत्याला भारतरत्न पुरस्कार यंदाही जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी फुले यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
महात्मा फुले दांपत्याला मरणोत्तर संयुक्तपणे भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी २४ वर्षांपासून सातत्याने मागणी केली जात आहे. महाराष्ट्रात विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना राज्य शासनाच्या वतीने २००० मध्ये प्रस्ताव व ठराव मंजूर करून भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात आली होती. महात्मा फुले सामाजिक न्याय परिषद, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा, अखिल भारतीय सर्ववर्गीय कलार समाज, महात्मा फुले महाराष्ट्र राज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण संघ तसेच सामाजिक कार्यकर्ते भूषण दडवे सातत्याने संघर्ष करीत आहेत.
१६ जून २०१५ ला तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून फुले दांपत्याला ‘भारतरत्न’ देण्याची मागणी केली होती. २०२० मध्ये मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही तशी मागणी केली होती.
… अन्यथा समाज धडा शिकवेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दखल घेऊन लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी महात्मा फुले दांपत्याला भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा, अन्यथा एससी, एसटी, ओबीसी समाज घडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते भूषण दडवे यांनी दिला.