शेवगाव
राज्यातील राजकीय घडामोडीत माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली होती. परंतु निवडणुका समोर येताच त्यांनी पूर्ण तयारीनिशी शेवगाव येथे युवक परिवर्तन मेळावा घेतला. यातून नाव न घेता आमदार मोनिका राजळे यांच्यावर जोरदार टीका केली. युवकांनी परिवर्तनासाठी सज्ज राहण्याचे आवाहन करत विधानसभेसाठी रिंगणात उतरणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यांच्या भूमिकेकडे शेवगाव-पाथर्डी मतदार संघाचे लक्ष लागले होते.
शेवगाव शहरातील आखेगाव रस्त्यावरील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात आज युवक निर्धार परिवर्तन मेळावा पार पडला. शाहीर राजेंद्र कांबळे व सहकारी पथकाने सादर केलेल्या महाराष्ट्र गिताने परिवर्तन मेळाव्याची सुरुवात करण्यात आली.
युवकांना मार्गदर्शन करताना माजी आ.चंद्रशेखर घुले म्हणाले, एकेकाळी जिल्ह्यात आग्रेसर राहिलेला शेवगाव तालुका सध्या सर्वच क्षेत्रात पिछाडीवर गेला आहे. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याने मुलभूत सुविधांसह सर्वच क्षेत्रात तालुक्याची वाताहत झाली आहे. याबाबत जनतेने विशेषतः युवक वगनि जागृत होऊन परिवर्तन करण्यासाठी कटिबध्द होणे आवश्यक आहे. केवळ राजकारण डोळ्यासमोर ठेवून विकास कामांचा डांगोरा पिटविला जात आहे. त्यामुळे केवळ शेवगाव तालुक्यातच नव्हे तर पाथर्डी तालुक्याच्या जनतेत सुद्धा मोठ्या प्रमाणात अस्वस्थता दिसून येत आहे. जनतेबरोबर समर्थक कार्यकत्यांना उर्जा मिळावी यासाठी निर्धारपूर्वक जनतेचे प्रबोधन होण्यासाठी कटीबध्द असल्याचे ते म्हणाले.
पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितीज घुले म्हणाले, राजकीय पद असो वा नसो घुले परिवार सतत जनतेसोबत असल्याने कार्यकर्त्यांना नवीन उर्जा मिळावी यासाठी युवक निर्धार परिवर्तन मेळाव्याचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले.
मेळाव्यात बीडचे समाज प्रबोधनकार
डॉ. ज्ञानदेव काशिद, सुशिल शेळके यांनी बुथ कमिटी व घर तेथे कार्यकर्ता या संकल्पनेच्या अंमलबजावणी बाबत मार्गदर्शन केले. युवक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ज्येष्ठ नेते दिलीपराव लांडे, काकासाहेब नरवडे, अरुण पाटील लांडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार मुंढे, रामनाथ राजपुरे, कैलास नेमाणे, ताहेर पटेल, बाजार समितीचे सभापती एकनाथ कसाळ, उपसभापती गणेश खंबरे, मोहनराव गलांडे, देविदास पाटेकर, राजेंद्र दौंड, चाँद मणियार, यांचे सह गावोगावच्या समर्थक कार्यकर्त्याची मोठी उपस्थिती होती. संजय कोळगे यांनी सूत्रसंचालन केले. तर राहुल देशमुख यांनी आभार मानले.