माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढल्याची बघायला मिळत आहे अशीच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील कोथुळ येथे कोयत्याने वार करून एकाची हत्या करण्यात आली होती. याबाबत पत्नीच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात बेलवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने
या गुन्ह्याचा उलगडा करत प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच पतीचा काटा काढला असल्याचे तपासात उघड झाले. त्यामुळे फिर्यादी पत्नीसह सहा संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे येथून ताब्यात घेतले आहे. आरती योगेश शेळके (वय २६),
रोहित साहेबराव लाटे (वय २३, दोन्ही रा. कोथुळ, ता. श्रीगोंदा), शोएब महंमंद बादशहा मुंबई,विराज सतीश गाडे, (रा. सोलापूर बाजार, कॅम्प पुणे), आयुष शंभूसिंह, पृथ्वीराज अनिल साळवे, अनिश सुरेंद्र धडे (तिन्ही रा. घोरपडे पेठ, पुणे), असे ताब्यात घेतलेल्या आरोपींचे नाव आहे.
योगेश सुभाष शेळके या तरूणाची हत्या ३० जानेवारी रोजी धारदार कोयत्याने करण्यात आली होती. याबाबत मयताची पत्नी आरती योगेश शेळके यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
याबाबत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनेचा तपास करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिल्या. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने घटनास्थळाची पाहणी करुन आजूबाजूला विचारपूस केली असता घटनाक्रम पाहता फिर्यादीवरच पथकाचा संशय बळावला होता.
परंतु सुरुवातीला तांत्रिक विश्लेषणात घटनेला कोणताही आधार मिळत नसल्याने मयताचे घरी नेहमी येणारे, तसेच त्याचे सोबत दारु पिणारे ४ ते ५ इसमांना पथकाने ताब्यात घेतले. फिर्यादी पत्नी आरती हिनेदखील ताब्यात घेतलेल्या इसमांचा समावेश असल्याचे सांगत
पथकाची दिशाभूल केली. मात्र, गुन्हे शोधपथकाला याबाबत खात्री पटत नसल्याने पथकाने पुन्हा दोन दिवस कोथुळ गावात तपास सुरु केला. तांत्रिक विश्लेषणादरम्यान मयताचा भाचा शुभम लगड याचे मोबाईलवर रोहित साहेबराव लाटे (वय २३, रा. कोथुळ, हल्ली मुक्काम पुणे) याचा घटनेच्या दिवशी सकाळी कॉल आल्याचे दिसून आले.
त्यानंतर पथकाने पुणे येथून लाटे याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता मयताची पत्नी आरती व त्याचे प्रेमाचे संबंध असल्याचे पोलीस तपासात उघड झाले.