नेवासा
नेवासा तालुक्यातील गेवराई येथील शेतकरी कुटुंबातील विकास मनसुक कर्डिले यांची उपजिल्हाधिकारी निवड झाली आहे.
नेवासा तालुक्यातील गेवराई येथील रहिवासी असलेले शेतकरी कुटुंबातील विकास कर्डिले यांना दोन अपयशाच्या नतंर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत यश मिळाले. त्यांनी एमपीएससी परीक्षेत ११ वी रँक मिळवत उपजिल्हाधिकारीपदी गवसणी घातली. त्यामुळे नेवासा तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्याची मान उंचावली आहे.
विकासचे प्राथमिक शिक्षण गेवराई जिल्हा परीषद शाळा, माध्यमिक शिक्षण गेवराई येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे झाले. तर नगरच्या न्यू आर्टस् कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षणानंतर पुण्याच्या ढोले पाटील येथे मैकॅनिकल इंजिनिअर तो झाला.त्यानंतर २०१९, २०२० असे दोन वेळा एमपीएससी परीक्षेत त्याला अपयश आले. मात्र, २०२२ च्या परीक्षेत मात्र त्याने यश गाठले.
गेवराई गावात आनंदोत्सव…
उपजिल्हाधिकारीपदी निवड झाल्याचे कळताच गेवराई गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सरपंच सुनंदा कर्डिले, सेवा संस्था अध्यक्ष प्रतीक गोरे, माजी सरपंच कपूरचंद कर्डिले आदींच्या हस्ते विकास याचा ग्रामपंचायत,
सहकारी संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास गाव व परिसर जमा झाला होता. दोनवेळा अपयश आले. पण त्याने जिद्ध न सोडत आपली परिश्रम सुरू ठेवले आणि त्यास तिसऱ्यांदा यश मिळाले. याच गावच्या जान्हवी विनायक कर्डिले हिने याच परीक्षेतून सांख्यिकी विभागात संशोधन अधिकारीपदी यश मिळवले.
याच गावचा राहुल कर्डिले हा प्रशासकीय सेवेत आहे. तो आयएएस झालेला गावातील पहिला तरुण आहे. खेड्यातील विकासने मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे.