माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली होती. त्यामुळे खरा पक्ष कोणता याबाबतचा निकाल निवडणूक आयोगाकडे होता. हा निकाल आता लागला असून अजित पवार
गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेस फुटीचं प्रकरण प्रलंबित होतं. गेल्या सहा महिन्यातं याप्रकरणी १० सुनावण्या निवडणूक आयोगाकडे झाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निकाल दिला आहे. अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह बहाल करण्यात आलं आहे.
राज्यसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.फुटीनंतर पक्षाच्या चिन्हावर शरद पवार गटासह अजित पवारांच्या नेतृत्वाखालील गटानेही दावा सांगितला होता.
त्यामुळे हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला आणि याप्रकरणी झालेल्या सुनावणीनंतर आता आयोगाने राष्ट्रवादीचं चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह
अजित पवार गटाला देण्यात आल्याने हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. शरद पवार गटाला आता निवडणुकीला सामोरे जाताना नव्या पक्षासह आणि चिन्हासह निवडणुकीच्या मैदानात उतरावं लागणार आहे.




