माय महाराष्ट्र न्यूज:इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत असून इयत्ता दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होईल. कॉपीमुक्त परीक्षेसाठी महसूल
विभागाची २८ तर जिल्हा परिषदेची १८ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. कॉपी करताना किंवा कॉपी करून उत्तरे लिहिताना सापडलेल्या विद्यार्थ्याला एक ते तीन वर्षे (कॉपीचे प्रमाण पाहून)
पुन्हा परीक्षेला बसता येत नाही. त्यामुळे कोणीही कॉपी न करता प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी, असे आवाहन पुणे बोर्डाने केले आहे.संवेदनशील परीक्षा केंद्रांवर महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी बैठे पथक म्हणून नेमले जातील. तर उर्वरित
परीक्षा केंद्रावर अंगणवाडी पर्यवेक्षक, महसूल व जिल्हा परिषदेचे कर्मचारी, जिल्हा परिषद व खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची देखील नेमणूक करण्यात आली आहे. बैठे पथकात एकूण तीन सदस्य असतील, त्यात एक महिला
असणार आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास अगोदर विद्यार्थ्यांनी केंद्रावर हजर राहायचे असून पेपर सुरू झाल्यावर कोणालाही परीक्षेला बसू दिले जाणार नाही. परीक्षा हॉलमध्ये जाताना प्रत्येक
विद्यार्थ्याची अंगझडती घेतली जाईल, असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे.परीक्षा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पाणी वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नेमणूक आता शाळांना करता येणार नाही. बोर्डाने त्यासंबंधीचे आदेश सर्वच
केंद्रांना दिले आहेत. विद्यार्थ्यांना कॉपी पुरविण्याचे काम त्यांच्याच माध्यमातून होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर या वर्षीपासून परीक्षा हॉलवरील पर्यवेक्षकच स्वत:कडे पाण्याची बाटली ठेवून विद्यार्थ्यांना पाणी देतील,
असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये सोडताना पायात चप्पल, शुज बाहेर काढूनच आत प्रवेश द्यावा, अशाही बोर्डाच्या सूचना आहेत.कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे निर्णय निकालापूर्वीच होतात. संबंधित विद्यार्थ्याने खरोखर
कॉपी केली होती का, कॉपीतील किती मजकूर उत्तरपत्रिकेत जसाच्या तसाच लिहिला, नेमकी कॉपी कोणी केली होती यासंबंधीची माहिती घेताना त्या विद्यार्थ्याच्या मागील व पुढे बसलेल्या विद्यार्थ्याचाही
जबाब बोर्डाचे चौकशी अधिकारी नोंदवतात. त्यानंतर कॉपी प्रकरणातील विद्यार्थ्याला एक वर्षापर्यंत की तीन वर्षांपर्यंत परीक्षेची बंदी घालायची, याचा निर्णय बोर्डाकडून होतो.