नेवासा
नेवासा तालुक्यातील एकल महिलांच्या विविध समस्या व रोजगार संदर्भात असणाऱ्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करून एकल महिला समितीस सहकार्य केले जाईल अशी ग्वाही नेवासा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय लखवाल यांनी दिली.
तालुक्यातील एक महिलांच्या विविध प्रश्नांबाबत नेवासा तालुका साऊ एकल महिला समितीचे कार्यकर्ते कारभारी गरड , अप्पासाहेब वाबळे , भारत आरगडे , येडुभाऊ सोनवणे , रेणुका चौधरी आदींनी गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध समस्या मांडल्या. त्यात ड-यादीत नाव असून ही घरकुल मिळण्यास विलंब होणे, वैयक्तिक लाभाच्या योजना, बचत गटातून आर्थिक सहकार्य व इतर समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.
समितीने कोरोना कालावधीनंतर एकल महिलांच्या व त्यांच्या बालकांच्या विविध समस्या बाबत विविध शासकीय योजना , आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी केलेले काम व यापुढे करावयाच्या कामाची माहिती दिली.तसेच समितीने राज्यात केलेल्या कामाच्या अहवालाची प्रत गट विकास अधिकारी संजय लखवाल यांना सुपूर्द करण्यात आली . सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर यावेळी उपस्थित होते.
एकल महिलांच्या कोणत्याही अडचणी असल्यास आम्हाला संपर्क केल्यास योग्य ती दखल घेऊ असे सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर म्हणाले.