माय महाराष्ट्र न्यूज:बारावीची परीक्षा रद्दची बोर्डाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून याबाबत सविस्तर परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता विद्यार्थ्यांना लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून परीक्षा रद्द करण्यात आल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.सुधारित मूल्यमापनाचं धोरण आणि निकालाची तारीख मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांची आरोग्य सुरक्षितता आणि मानसिक स्वास्थ्य यांनाच प्राधान्य देण्याची सरकारची भूमिका आहे. 12वीच्या परीक्षेचे महत्त्व लक्षात घेता मूल्यमापनाचे एकसमान सूत्र निश्चित करावं, अशी मागणी केंद्राकडे करण्यात आली होती.
सर्व संबंधित घटकांशी केलेल्या चर्चेअंती सध्याचे वातावरण परीक्षेसाठी पोषक नसल्यानं परीक्षा रद्द करून पर्यायी मूल्यमापनाच्या आधारे निकाल घोषित करावा, असं महाराष्ट्र सरकारने केंद्राला यापूर्वीच सुचवलं होतं असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
सन 2020-21 या शौक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षिततेचा विचार करता रद्द करण्यात येत आहे. इयत्ता 12 वी च्या परीक्षेसाठी प्रविष्ठ सर्व विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर अंतर्गत
मूल्यांकनाच्या आधारे उत्तीर्ण करण्यात यावे. इयत्ता बारावीची परीक्षा रद्द केल्यामुळे, अंतर्गत मूल्यमापनाच्या कार्यपद्धतीबाबत तसेच गुणपत्रक /प्रमाणपत्र देण्याबाबत स्वतंत्रपणे निर्देश निर्गमित करण्यात येतील. सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेला असून त्याचा संकेतांक क्रमांक 202106111 720454121 असा आहे.