माय महाराष्ट्र न्यूज:आगामी निवडणूकीसाठी सर्व युतींची जोरदार तयारी सुरु आहे. त्याचबरोबर सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. महायुतीबरोबरच महाविकास
आघाडीमध्ये घटक पक्षांसोबत चर्चा सुरु आहे. दरम्यान, कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया देताना कोल्हापूरच्या जागेबाबत सूचक वक्तव्य केले. त्याचबरोबर मराठा आरक्षण
विधेयकाबाबत बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली आहे.कोल्हापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपाबद्दल मत मांडले. थोरात म्हणाले, “जागावाटप
बाबत एकमत नाही असे नाही आमची चर्चा सुरू आहे. उर्वरित जागांबाबत निर्णय होईल. उमेदवार ठरविण्याबाबत प्रक्रिया सुरू होईल. सतेज पाटील हे कोल्हापूरची जागा काँग्रेससाठी मिळावी यासाठी आग्रही
आहेत. असे सूचक विधान बाळासाहेब थोरात यांनी केले. सतेज पाटील पुढील काळातील मोठे नेते असून त्यांनाच पुढे सगळं सांभाळायचं आहे. ते महाराष्ट्र सांभाळू शकतात असे त्यांचे नेतृत्व आहे. पुढचा काळ त्यांचाच
आहे, युवक नेतृत्वाने पुढे यावे आणि काम सांभाळावे,” असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी सतेज पाटील यांच्याबाबत व्यक्त केला. त्यामुळे कोल्हापूरच्या जागेसाठी सतेज पाटील यांचे नाव चर्चेत आहे.
कुणी पक्षातून गेल्याने त्याचा फार परिणाम होतो असं नाही. भाजप ज्या पद्धतीने काम करतोय, स्वायत्त संस्थांचा गैरवापर सुरू आहे, लोकांना आवडले नाही. या सगळ्याचा पक्षावर कुठल्याही पद्धतीने परिणाम
होणार नाही. नेते गेले तरी लोक माणसं आमच्यासोबत आहेत. एखाद्याच्या नावाबद्दल चर्चा सुरू करायची अशी भाजपची नीती आहे आणि खोट्या बातम्या पसरवणं हा तर त्यांचा अजेंडा आहे. हे सरळ राजकारण आहे, ते तत्त्व विचारांच्या पलीकडे
गेलेले राजकारणी आहेत. याला निरोगी राजकारण म्हणत नाहीत,” असा टोला बाळासाहेब थोरात यांनी भाजपला लगावला आहे.