माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवत शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय फसवा असून कांद्यावरील निर्यात बंदी पूर्णत: उठवली पाहिजे, असं म्हणत
महाविकास आघाडीच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे
पाटील आणि खासदार सुजय विखे यांच्या फोटोंवर कांदा ओतून जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विखे-पाटलांच्या विरोधक प्रभावती घोगरे यांनी कांदा निर्यात बंदीवरून विखे पिता-पुत्रांवर जोरदार टीका केली.
“सरकारला शेतीचं अर्थकारण समजून सांगणं हे विधिमंडळात प्रतिनिधीत्व करणाऱ्या आमदार आणि खासदारांचे काम आहे”, असं म्हणत सरपंच प्रभावती घोगरे यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह खासदार सुजय विखे यांचे चांगलेच कान टोचले.
“तुम्ही आमचे प्रश्न संसदेत आणि विधीमंडळात मांडावे म्हणून आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे. गावात लुडबुड करायची आणि गावात डरकाळ्या फोडायच्या यापेक्षा शेतकऱ्यांसाठी सभागृहात
डरकाळी फोडा”, अशी टीका सरपंच घोगरे यांनी केली. यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
कोण आहेत प्रभावती घोगरे?
प्रभावती घोगरे या लोणी खुर्द गावाच्या विद्यमान सरपंच आहेत. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या कट्टर विरोधक तसेच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या निकटवर्तीय अशी घोगरे यांची ओळख आहे.