माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघाच्या (महानंद) २१ पैकी १९ संचालकांनी राजीनामे दिले. राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने (एनडीडीबी) शासनाकडे २५३ कोटी ५७ लाख रुपयांची
मदत मागितली आहे. मागील महिन्यात ‘महानंद’च्या संचालक मंडळाने महानंद ‘एनडीडीबी ‘ला चालविण्यास देण्यासाठी मान्यता दिली होती. दरम्यान यावर आता राज्यातील विरोधक आक्रमक झाले आहेत.
दरम्यान यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.ते म्हणाले की, महानंदचा कारभार आता गुजरातमधून चालेल.
राज्यातील उद्योग गुजरातकडे वळविले जात आहे. महानंदचे अध्यक्ष कोण होते ? राधाकृष्ण विखे पाटील यांचे सख्खे मेहुणे. ‘महानंद’ ची ५० एकर जागा उद्योगपती अदानींना विकण्याचा मुख्यमंत्री, दोन्ही
उपमुख्यमंत्र्यांचा डाव असल्याचा आरोप राऊतांनी केला.राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, शेवटी शिंदे सरकारने करून दाखवलं! महानंद डेअरीचा संपूर्ण कारभार गुजरातला नेऊन दाखवला.
महाविकास आघाडीच्या काळात गुजरात सरकारला महाराष्ट्रात जे साध्य करता आलं नाही ते सर्व शिंदे सरकारच्या काळात त्यांना करून घेता येत आहे. शेवटी मुख्यमंत्री पद मिळवून देण्यासाठी आर्थिक ताकद जी गुजरातकडून मिळाली आहे .
त्या उपकारांची परतफेड मुख्यमंत्री शिंदे करत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.महानंद’च्या पुनरुज्जीवनासाठी ‘एनडीडीबी’ने बृहत् आराखडा शासनाला सादर केला आहे. त्यानुसार २५३ कोटी ५७ लाख इतकी रक्कम सरकारकडून सॉफ्ट
लोन किंवा भागभांडवल स्वरूपात देण्यात यावी, असा ठरावही करण्यात आला. हा ठराव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. या रकमेतून कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती तसेच महानंदची विद्यमान यंत्रणा ‘एनडीडीबी’
नीट करू शकेल असे सांगितले जात आहे. सध्या महानंदकडे ९४० कर्मचारी आहेत. त्यापैकी ५३० कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय दिला आहे.विखे पाटलांचे प्रत्त्यूत्तर:संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर राज्याचे दुग्धविकास
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, संजय राऊत हे बेताल वक्तव्य करत आहेत. त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे. त्यांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावेत, मी राजकीय संन्यास घेईन.
त्यांच्या या बेताल वक्तव्याबद्दल त्यांच्याविरुद्ध अब्रू नुकसानीचा दावाही दाखल करणार आहे.