माय महाराष्ट्र न्यूज:वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे वातावरणाचे चक्र पूर्णपणे बिघडले असून हवामानात सातत्याने बदल होताना
दिसून येत आहेत. या बदलत्या वातावरणामुळे अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस कोसळत असून शेतकऱ्यांचं सर्वाधिक नुकसान होत आहे. अवकाळीचं संकट कधी दूर होईल, याची वाट शेतकरी
पाहत आहेत. अशातच हवामान खात्याने अवकाळीबाबत मोठी अपडेट दिली आहे.भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. आजपासून
पुढील ४ ते ५ दिवस महाराष्ट्र दिल्ली, हरियाणा आणि पंजाबसह उत्तर भारतातील अनेक भागात अवकाळी पावसाचा इशारा (Rain Alert) दिला आहे.आयएमडीच्या अंदाजानुसार, शनिवारपासून (२४ फेब्रुवारी) २९ तारखेपर्यंत महाराष्ट्रासह
उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल. तर काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आलाय.
पुढील २४ तासांत अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणी मुसळधार पावसासह गारपीटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर हलका पाऊस पडू शकतो,
असं हवामान खात्याने सांगितलं आहे. दरम्यान, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीममधील काही भागातही हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.दुसरीकडे महाराष्ट्राबाबत
बोलायचं झाल्यास, राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून, उद्यापासून (२५ फेब्रुवारी) विदर्भासह मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर किमान तापमानात पुन्हा वाढ होण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.