नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील कृषी विज्ञान फार्मवर भारतीय कृषि अनुसंधान परिषद भारतीय ऊस संशोधन संस्था,जैविक नियंत्रण केंद्र, प्रवरानगर व लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखना यांचे संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाति उप योजना (एससीएसपी) कार्यक्रमा अंतर्गत गुरुवार दि. २९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता आयोजित “एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण व स्प्रेयर पंप वितरण” कार्यक्रम लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आ.नरेंद्र घुले पाटील यांचे अध्यक्षेतेख़ाली संपन्न झाला.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष
माजी आ. पांडूरंग अभंग,संचालक अड. देसाई देशमुख,काकासाहेब नरवडे, जनार्दन कदम, शिवाजी कोलते, काकासाहेब शिंदे,प्रा. नारायण म्हस्के, भाऊसाहेब कांगुणे, अशोकराव मिसाळ, संतोष पावसे,विष्णुपंत जगदाळे,
दादा गंडाळ, दत्तात्रय काळे, कामगार संचालक सुखदेव फुलारी, संभाजीराव माळवदे, कारखान्याचे सचिव रवींद्र मोटे,मुख्य शेतकी अधिकारी सुरेश आहेर, जनसंपर्क अधिकारी कल्याण म्हस्के, प्रशासकीय अधिकारी कारभारी गायके,अशोक वायकर,सेवानिवृत्त तहसीलदार श्री.शेंडे,प्रगतशील शेतकरी विश्वनाथ चव्हाण, प्रवरानगर जैविक नियंत्रण केंद्राचे प्रभारी व शास्त्रज्ञ डॉ. ज्ञानेश्वर बोरसे,शास्त्रज्ञ डॉ. योगेश थोरात,कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ.शामसुंदर कौशिक आदी यावेळी उपस्थित होते.
ऊस किडीचे एकात्मिक नियंत्रण या विषयावर मार्गदर्शन करताना
प्रवरानगर येथील जैविक नियंत्रण केंद्राचे शास्रज्ञ डॉ.योगेश थोरात म्हणाले, ऊस पिकावर मोठया प्रमाणावर खोड कीड, कांडी कीड व शेंडा किडीची प्रादुर्भाव होऊन एकरी उत्पादन कमी होते.त्यामुळे रासायनिक औषधांचा वापर टाळून परभक्षी जैविक किडींचा वापर करून ऊस कीड नियंत्रण करावे.ऊस पिका मध्ये ऊस पोखरणाऱ्या किडीचा व मुळ-बुडखा किडीचा ही प्रादुर्भाव आढळून येतो.बदलते हवामान आणि पाचट जाळल्यामुळे जमिनीतील जैविक घटकांचा ऱ्हास होतो. अधिक उत्पादन घेण्यासाठी जमीनीचे आरोग्य उत्तम राखावे. ऊसाची बाळ बांधणी व मोठी बांधणी करतांना योग्य ती काळजी घ्यावी,ऊसाची वाळलेली पाने काढून टाकावीत. कीटकनाशकांचा चक्रकार पद्धतीने वापर करावा.वारंवार तीच ती किटकनाशके वापरू नये.
माजी आ.अभंग म्हणाले, एकरी ऊस उत्पादन वाढवून उत्पादन खर्च कमी करण्यासाठी जास्त साखर उतारा देणाऱ्या आणि लवकर पक्व होणाऱ्या ऊस जातीची लागवड केली पाहिजे.कृषी विज्ञान केंद्राने तयार केलेल्या ऊस रोपांची लागवड केल्यास दीड महिना अगोदर ऊस नोंद लागते,पाणी कमी लागते व बेणे-लागवड खर्च कमी होतो. ऊस किडीचे नियंत्रण फार महत्त्वाचे आहे. उन्हाचे दिवस सुरू झाले की पहिले खोड किडीला सुरुवात होते.नंतर कांडीकीड येते आणि शेंड्याला सुद्धा किड लागते,
उसाची वाढ थांबते, उसाचे उत्पादन घटते.त्यामुळे कृषी विज्ञान केंद्राच्या शास्रज्ञानी सांगितलेल्या उपाय योजना करून ऊस किडीचे उच्चाटन करा.
प्रारंभी माजी आ.नरेंद्र घुले पाटील यांचे हस्ते अनुसूचित जाती शेतकऱ्यांना स्प्रेयर पंपाचे व प्रशिक्षण किटचे वितरण करण्यात आले.
प्रवरानगर जैविक नियंत्रण केंद्राचे प्रभारी व शास्त्रज्ञ डॉ. ज्ञानेश्वर बोरसे यांनी प्रास्ताविक केले. ऋतुजा निर्मळ यांनी सूत्रसंचालन केले.शेतकरी राजेंद्र यांनी आभार मानले.