नेवासा/सुखदेव फुलारी
राजकारण प्रवेश हा विषय आम्ही स्वप्नातही विचार न केलेला भाग आहे असल्याचा निर्वाळा श्री दत्त मंदिर संस्थान, श्री क्षेत्र देवगडचे महंत गुरुदास भास्करगिरीजी महाराज यांनी दिला.
भास्करगिरी महाराज निवडणुकीच्या रिंगणात’ असे वृत्त काही माध्यमातून प्रसिद्ध झाले होते,त्या पार्श्वभूमीवर गुरुदास भास्करगिरीजी महाराज यांनी प्रसिद्धी पत्रक काढून खुलासा केला की,
श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांनी श्री क्षेत्र देवगड येथे देवस्थानचे उत्तराधिकारी म्हणून १९७५ साली आमची नियुक्ती केली. यामध्ये हरिचिंतन-धर्मकार्य-कीर्तनाच्या माध्यमातून अध्यात्माचा प्रचार प्रसार करणे अभिप्रेत असून श्री गुरूंच्या आदेशानुसार गेली ५० वर्ष हे कार्य अविरतपणे सुरू आहे.
नुकतेच काही प्रसारमाध्यमांमध्ये ‘भास्करगिरी महाराज निवडणुकीच्या रिंगणात’ असे वृत्त प्रसिद्ध झाले ते वाचून मन व्यथित झाले. राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करणारी, वेगवेगळ्या जाती धर्मातील वेगवेगळ्या पक्षातील मातब्बर मंडळी ही रात्रंदिन देश तथा राज्याच्या विकासासाठी प्रयत्नशील असतात. हे कार्य त्यांच्याकडून उत्तम घडत राहो ही सदिच्छा. परंतु वैयक्तिक आमचा कुठल्याही राजकीय तथा पक्ष संघटनेची दूर दूर पर्यंत संबंध नाही. तसेच कुठलेही राजकीय पद भोगण्याची अभिलाषाही नाही. प्रत्यक्ष तथा अप्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेमध्येही आम्ही आज पर्यंत भाग घेतलेला नाही. आणि भविष्यातही घेणार नाही. त्यामुळे या निवेदनाद्वारे प्रसारमाध्यमे तथा प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी व तमाम जनतेस आम्ही ज्ञात करू इच्छितो. आम्ही कुठल्याही राजकारणात निश्चितच नाही.
सर्व पक्ष आमच्यासाठी समान आहेत. विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून श्रीराम जन्मभूमी मुक्तीसाठी सुरुवातीच्या कालखंडापासून आम्ही धर्मकार्य म्हणून सक्रिय सहभाग नोंदवला आहे. साधू संतांच्या कृपाशीर्वादाने व जनता जनार्दनाच्या इच्छेने मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचे मंदिर भव्यदिव्य स्वरूपात पूर्ण झाले. हा आमच्यासाठी आनंदाचा भाग आहे. तथापि यामध्ये कुठल्याही संघटनेचा संबंध नव्हता. धर्मकार्य म्हणून सर्व जाती धर्मातील लोक या कार्यात एकत्र आलेच पण अनेक पक्षातील मंडळीही रामभक्त म्हणून या कार्यात सहभागी झाले. त्यांचेही आम्ही स्वागतच केले. राजकारण प्रवेश हा विषय आम्ही स्वप्नातही विचार न केलेला भाग आहे, जी मंडळी या क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांना आमच्या शुभेच्छा. याबाबत कुठलाही गैरसमज करू नये व कृपया या आशयाच्या बातम्या कुणीही प्रसारित करू नये.