माय महाराष्ट्र न्यूज: ४०० पार चा नारा देत भारतीय जनता पक्षाने लोकसभेची जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशातच भाजपला
गुजरातमध्ये मोठा धक्का बसला असून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोन बड्या नेत्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता या दोन्ही ठिकाणी भाजपला नव्या उमेदवारांचा
शोध घ्यावा लागणार आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, साबरकांठा येथील भाजपचे उमेदवार भिकाजी ठाकोर आणि वडोदरा मतदारसंघातील भाजप उमेदवार रंजनबेन भट्ट यांनी लोकसभा
निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली आहे. पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या दोन्ही नेत्यांनी लोकसभा लढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता या दोन्ही जागांवर भाजपला नवे उमेदवार निवडावे लागणार आहेत.
वडोदरा लोकसभा जागेसाठी रंजनबेन भट्ट यांच्या नावाची घोषणा झाल्यापासून भाजपमध्ये विरोध सुरू झाला आहे. रंजनबेन भट्ट यांच्या नावाला भाजप नेत्या ज्योतिबेन पंड्या यांनी विरोध केला होता. त्यांच्या
नावाचा निषेध करणारे बॅनरही शहरातील विविध भागात लावण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे.
वैयक्तिक कारणांमुळे २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.तसेच साबरकांठा येथील भाजपचे उमेदवार भिखाजी ठाकोर यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याची
घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांनी ही माहिती दिली आहे. मात्र निवडणुक न लढण्याचे कारण मात्र त्यांनी सांगितलेले नाही. त्यामुळे आता ऐन निवडणुकीच्या लगबगीत भाजपला नवा उमेदवार शोधाला लागणार आहे.